Khadakwasla Dam Water Discharge : पुणे जिल्हा आणि लगतच्या धरणक्षेत्रांमध्ये शुक्रवारी पहाटे 6 पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खडकवासला साखळीतील धरणांमध्ये पाण्याची प्रचंड आवक होत असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाटबंधारे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून खडकवासला धरणाचे दरवाजे अधिक उघडून मुठा नदीत 16,247 क्युसेकवरून थेट 22,880 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
पाऊस असाच सुरु राहिल्यास हा प्रवाह 30,000 क्युसेक पर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी 8 जुलै 2026 रोजी चालू हंगामातील सर्वाधिक 27,203 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, परंतु आजच्या पावसामुळे तो विक्रम मोडला जाण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा – Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; सांगली-कोल्हापूरकरांना मोठा दिलासा
पावसाच्या परिस्थितीनुसार, नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात ऐनवेळी बदल केला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी पूर्ण काळजी घ्यावी, नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहात जाणे टाळावे, तसेच आपली गुरेढोरे आणि महत्त्वाचे सामान त्वरित सुरक्षित जागी हलवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडता केवळ अधिकृत प्रशासकीय अपडेट्सवर विश्वास ठेवावा आणि सतर्क राहावे, असे आवाहन कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.