Ketan Agarwal's Father Expresses Grief : 'जर मी माझ्या मुलाचे बोलणे वेळेत गांभीर्याने घेतले असते, तर आज तो जिवंत असता आणि आमच्यात असता,' ही अत्यंत वेदनादायी खंत आहे लोहगड हत्याकांडातील मृत केतन अग्रवालच्या वडिलांची. पुण्यातील नामावंत व्यावसायिक विशाल अग्रवाल यांनी उघड केले की, फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाल्यापासूनच आरोपी सिया गोयल ही सतत फोनवर व्यस्त असायची, ज्यामुळे केतनच्या मनात तिच्याबद्दल संशय निर्माण झाला होता. केतनने घरच्यांकडे 'चेतन चौधरी' या नावाचा थेट उल्लेख करत सियाच्या चारित्र्याची पडताळणी करण्याची विनंती केली होती. मात्र, कौटुंबिक ओळखीचे स्थळ असल्याने कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि केतनला काळजी न करण्याचा सल्ला दिला, जो पुढे जाऊन त्याच्यासाठी जीवघेणा ठरला.
बाली ट्रिप फ्लॉप करण्यासाठी विमानतळावरच खेळली चाल
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात सियाच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीतून तिची धक्कादायक मानसिकता उघड झाली आहे. याच महिन्यात केतन आणि सिया या दोघांचे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी इंडोनेशियातील 'बाली' येथे जाण्याचे नियोजन होते. मात्र, ते मुंबई विमानतळावर पोहोचले असता अचानक केतनचा पासपोर्ट गायब झाल्याचे समोर आले आणि त्यामुळे ही ट्रिप रद्द करावी लागली. पोलीस तपासात आता असा धक्कादायक खुलासा झाला आहे की, सियानेच तो पासपोर्ट मुद्दाम चोरून लपवला होता, जेणेकरून तिला केतनसोबत परदेशात जावे लागू नये. याबाबत अशीही बाब समोर आली आहे की, सियाने केतनचा पासपोर्ट फाडून टॉयलेटमध्ये टाकून दिला.
हेही वाचा – Ketan Agrawal Death Case: केतनला लोहगडावरून का ढकललं? सियाचा पोलिसांसमोर गुन्ह्याचा धक्कादायक खुलासा
'तिथे साप होता…' पहिल्या अयशस्वी प्रयत्नाचा थरारक बनाव
तपासातील सर्वात अंगावर काटा आणणारा खुलासा म्हणजे, 18 जून रोजी झालेल्या हत्येच्या अवघ्या 4 दिवसांपूर्वी, म्हणजेच 14 जून रोजी सियाने केतनला लोहगड किल्ल्यावरच ट्रेकिंगच्या बहाण्याने आणले होते. तिथे तिने केतनला कड्यावरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र, केतन नशिबाने एका झाडाच्या आधाराने कसा तरी वाचला. केतनने याबाबत विचारले असता, 'तिथे अचानक साप आला होता आणि मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होते,' असा खोटा बहाणा करून सियाने त्याला घट्ट मिठी मारली आणि स्वतःचा बचाव केला. निष्पाप केतनने याही वेळेस तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला; परंतु, हा त्याच्या हत्येचा पहिला रचलेला कट होता, जो अपयशी ठरला होता. मात्र, पुढील वेळेस अधिक सावधगिरी बाळगून त्याला संपवण्याचा प्लॅन करण्यात आला आणि त्यानंतर केतन वाचू शकला नाही.
उच्चशिक्षित उद्योजक आणि उदयपूरमधील 'शाही' विवाहाच्या स्वप्नाची राखरांगोळी
मृत केतन हा महाराष्ट्रातील अग्रगण्य वेअरहाउस डेव्हलपर कंपनी 'सक्सेस ग्रुप'चा संचालक म्हणून कार्यरत होता. त्याने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील नामांकित 'बॅबसन कॉलेज'मधून बिझनेस मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण पूर्ण केले होते आणि 2023 मध्ये तो पुण्यात परतून वडिलांच्या कोट्यवधींच्या व्यवसायात सक्रिय झाला होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे त्यांचे शाही पद्धतीने अतिशय थाटामाटात लग्न होणार होते. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनचा लोहगडावर क्रूर अंत घडवून आणला. दोन्ही आरोपींनी आता पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.