Ketan Agarwal CDR Report : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळल्याने 25 वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच रचलेला पूर्वनियोजित कट होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी सिया प्रवीण गोयल (वय 20, रा. बिबवेवाडी, पुणे) आणि तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी (वय 22, रा. कोंढवा, पुणे) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
लग्नाची जय्यत तयारी आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच घात
मृत केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह निश्चित झाला होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात अत्यंत थाटामाटात हा सोहळा आयोजित केला होता. या विवाहसोहळ्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी जयपूर येथे तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून एक भव्य पॅलेस बुक केले होते, तसेच पाहुण्यांना नेण्या-आणण्यासाठी 2 विशेष विमानांची सोय देखील करण्यात आली होती. ज्या मुलीसोबत नवीन आयुष्याची स्वप्ने केतन पाहत होता, तिच्याच वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी तो निसर्गाच्या सानिध्यात गेला होता. मात्र, दुर्दैवाने त्याच दिवशी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि आनंदाचे रूपांतर क्षणात शोकाकुल वातावरणात झाले.
मोबाईल CDR मधून धक्कादायक सत्य समोर
पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेव्हा आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचे मोबाईल रेकॉर्ड्स (CDR) तपासले, तेव्हा त्यांच्यातील गुप्त प्रेमसंबंधांचा उघड पर्दाफाश झाला. तपासात समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 18 जून (अवघ्या साडेपाच महिन्यात) सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 वेळा फोनवर संभाषण झाले होते. या 6 महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या एकूण संभाषणाचा वेळ तब्बल 238 तासांचा होता.
इतर मुलांशी चॅटिंग: केतनशी विवाह निश्चित झालेला असतानाही सियाचे इतरही अनेक मुलांसोबत आक्षेपार्ह चॅटिंग सुरू होते आणि ती एका मुलासोबत फिरायला उदयपूरलाही गेली होती, असा संशय आहे.
दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न
18 जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर सिया गोयलने हा निव्वळ एक अपघात असल्याचे भासवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली; मात्र, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना घटनास्थळाची भौगोलिक स्थिती पाहून संशय आला. त्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हत्येचे गुपित उघड झाले.
याआधीही झाला होता घातपाताचा प्रयत्न; सीसीटीव्ही आणि वडिलांचे आरोप
अग्रवाल कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, सियाने यापूर्वीही केतनला 3 ते 4 वेळा लोहगड किल्ल्यावर नेले होते. यातही धक्कादायक बाब म्हणजे 14 जून रोजी जेव्हा दोघे पुन्हा लोहगडावर गेले होते, तेव्हाही सियाने केतनला कड्यावरून ढकलून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. केतन हा एक अत्यंत अनुभवी ट्रेकर असल्याने तो स्वतःहून पाय घसरून पडणे केवळ अशक्य होते, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी किल्ल्यावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, आरोपी चेतन चौधरी हा अत्यंत संशयास्पद पेहरावात चेहरा लपवून केतन आणि सियावर पाळत ठेवत असल्याचे स्पष्ट दिसले. 'तिने तिच्या प्रियकराला 18 तारखेला गडावर बोलावलं आणि त्याला सांगितलं आमच्या केतनला धक्का मार', असा थेट आरोप मृत केतनच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. या भक्कम तांत्रिक डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या बळावर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
विवाह अमान्य असल्याने रचला क्रूर खुनी कट
सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत घरच्यांच्या इच्छेने होत असलेले लग्न मान्य नव्हते. हा विवाह रद्द करण्यासाठी आणि आपल्या प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. ठरलेल्या प्लॅननुसार केतनला लोहगड किल्ल्यावर गाठून योग्य संधी साधताच थेट खोल दरीत ढकलून देण्यात आले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या थरारक मर्डर मिस्ट्रीचा पुढील तपास पोलीस करत आहेत.