Mojtaba Khamenei is in a severe medical condition : इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत सध्या जगभरात चिंतेचे आणि संशयाचे सावट पसरले आहे. एका ब्रिटीश वृत्तसंस्थेने दिलेल्या एका धक्कादायक अहवालानुसार, मोज्तबा हे सध्या कोम (Qom) शहरात बेशुद्धावस्थेत असून त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे उपचार सुरू आहेत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या एका भीषण हवाई हल्ल्यात मोज्तबा यांना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामध्ये त्यांचे वडील आयातुल्ला अली खामेनी यांचा अंत झाला होता. तेव्हापासून ते सार्वजनिक जीवनातून गायब असल्याने इराणमध्ये मोठे सत्तासंकट निर्माण झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, इस्रायली हल्ल्यात आयआरजीसीचे गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी ठार झाल्याची बातमीही समोर आली आहे. अनेक मोठ्या नेत्यांच्या मृत्यूमुळे आणि काहींच्या गंभीर स्थितीतील प्रकृती अस्वास्थ्यामुळे इराण अस्थिरता आणि दिशाहीनतेकडे वाटचाल करत आहे. यातच लष्कराने देशाचा ताबा मिळवल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
कोममध्ये उपचार आणि गुप्तचर अहवाल
तेहरानपासून साधारण 87 मैल अंतरावर असलेल्या शिया मुस्लिमांचे धार्मिक केंद्र मानल्या जाणाऱ्या कोम शहरात मोज्तबा यांना ठेवण्यात आले आहे. एका राजनैतिक मेमोमधील दाव्यानुसार, मोज्तबा यांची प्रकृती इतकी खालावली आहे की, ते राज्यकारभाराचे कोणतेही निर्णय घेण्यास सध्या पूर्णपणे असमर्थ आहेत. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने असेही म्हटले आहे की, युद्धाच्या सुरुवातीला झालेल्या त्या भीषण हल्ल्यात मोज्तबा यांच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. विशेष म्हणजे, या हल्ल्यात त्यांच्या पत्नीचा, आईचा आणि मुलाचाही मृत्यू झाला असून, मोज्तबा हे सध्या आपल्या कुटुंबातील एकमेव वारसदार उरले आहेत जे मृत्यूशी झुंज देत आहेत.
लष्कराचा सत्तापालट? IRGC कडे खरी ताकद
इराणमधील अंतर्गत परिस्थिती अतिशय स्फोटक बनली असून, 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) ने देशाच्या प्रशासनावर प्रत्यक्ष ताबा मिळवल्याचे वृत्त आहे. मोज्तबा खामेनी हे केवळ नाममात्र प्रमुख असून पडद्यामागून सर्व सूत्रे आता लष्कराच्या हाती गेल्याचे बोलले जात आहे. अगदी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूर पेझेश्कियान यांनाही सर्वोच्च नेत्याला भेटण्यापासून रोखण्यात आल्याने संशयाची सुई लष्कराकडे वळली आहे. पेझेश्कियान यांनी घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय लष्कराकडून सर्रासपणे रद्द केले जात असल्याने, इराणमध्ये धार्मिक नेतृत्वापेक्षा आता लष्करी हुकूमशाही प्रबळ होत असल्याचे दिसून येत आहे.
सामूहिक दफनविधीची तयारी
कोम शहरात सध्या एका मोठ्या समाधीस्थळाची पायाभरणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे समोर आले आहे. यामध्ये केवळ दिवंगत नेते अली खामेनीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही एकापेक्षा जास्त कबरी तयार ठेवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे मोज्तबा खामेनी यांचा मृत्यू जवळ आला आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मार्च 2026 च्या सुरुवातीला उत्तराधिकारी म्हणून नाव घोषित झाल्यापासून मोज्तबा यांचे कोणतेही ऑडिओ किंवा व्हिडिओ संदेश समोर आलेले नाहीत, केवळ काही लेखी विधाने प्रसिद्ध झाली आहेत, ज्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
इराणचा इन्कार आणि जागतिक चिंता
इराण सरकारने मात्र आपल्या सर्वोच्च नेत्याच्या प्रकृतीबाबतचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मोज्तबा खामेनी हे पूर्णपणे सुरक्षित असून तेच देशाचा कारभार पाहत असल्याचे अधिकृत पत्रकात म्हटले आहे. परंतु, जागतिक स्तरावर मात्र इराणच्या या दाव्यांवर कोणीही विश्वास ठेवताना दिसत नाही. अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांना मोज्तबा यांच्या प्रकृतीची आणि ठिकाणाची अचूक माहिती असल्याचे समजते. आखाती देशांमध्ये फिरत असलेल्या मेमोमुळे इराणच्या भविष्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून, जर मोज्तबा यांना काही झाले, तर इराणमध्ये गृहयुद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा – Iran-Israel War: इराणला मोठा धक्का! इस्रायली हल्ल्यात आयआरजीसीचे गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी ठार