iPhone Users Warning: ॲपलची उत्पादने वापरणाऱ्या कोट्यवधी भारतीयांसाठी केंद्र सरकारने धोक्याचा इशारा जारी केला आहे. आयफोन, आयपॅड, मॅकबुक आणि ॲपल वॉच यांसारख्या उपकरणांच्या सॉफ्टवेअरमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या असून, हॅकर्स याचा फायदा घेऊन तुमचा अत्यंत संवेदनशील डेटा चोरू शकतात. भारताची सायबर सुरक्षा एजन्सी 'सर्ट-इन'ने (CERT-In) या त्रुटींना 'उच्च गंभीर' (High Severity) श्रेणीत वर्गीकृत केले आहे.
तुमचे डिव्हाइस हॅकर्सच्या निशाण्यावर?
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या 'सर्ट-इन'नुसार, ॲपलच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अशा काही पळवाटा आहेत, ज्याचा वापर करून हल्लेखोर तुमच्या डिव्हाइसवर दूरस्थपणे (Remotely) ताबा मिळवू शकतात. यामध्ये हॅकर्स सुरक्षेचे स्तर भेदून कोणताही घातक कोड कार्यान्वित करू शकतात, ज्यामुळे तुमचा खाजगी डेटा लीक होण्याचा किंवा 'डिनायल-ऑफ-सर्व्हिस' (DoS) सारख्या हल्ल्यांचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका वैयक्तिक वापरकर्त्यांसह मोठ्या कॉर्पोरेट संस्थांनाही बसू शकतो.
असुरक्षिततेचे नेमके कारण काय?
ही समस्या ॲपलच्या सॉफ्टवेअर इकोसिस्टममधील विविध घटकांमध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे (Vulnerabilities) उद्भवली आहे. हॅकर्स या त्रुटींचा वापर करून सिस्टीमची कार्यपद्धती बदलू शकतात किंवा सुरक्षिततेसाठी असलेली 'बॅरिकेड्स' सहजपणे ओलांडू शकतात. अनेक 'CVE' (Common Vulnerabilities and Exposures) चा संदर्भ देत एजन्सीने स्पष्ट केले आहे की, एकाच वेळी अनेक मार्गांनी हल्ले करून हॅकर्स प्रशासकीय प्रवेश मिळवू शकतात.
कोणती उपकरणे आहेत धोक्यात?
हा धोका प्रामुख्याने जुन्या सॉफ्टवेअर आवृत्त्यांवर चालणाऱ्या ॲपल उत्पादनांना आहे. यामध्ये खालील सिस्टिम्सचा समावेश आहे:
iOS आणि iPadOS (जुन्या आवृत्त्या)
macOS (मॅक कॉम्प्युटर्स)
watchOS (ॲपल वॉच)
Safari Browser आणि इतर सिस्टीम सॉफ्टवेअर.
बचावासाठी काय करावे?
सरकारने या धोक्यापासून वाचण्यासाठी वापरकर्त्यांना तातडीने खालील पावले उचलण्याचे आवाहन केले आहे:
सॉफ्टवेअर अपडेट: तुमची सर्व ॲपल उपकरणे त्वरित 'लेटेस्ट सॉफ्टवेअर व्हर्जन'वर अपडेट करा.
अज्ञात लिंक्स टाळा: संशयास्पद ईमेल किंवा मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
अधिकृत ॲप्स: नेहमी ॲपलच्या अधिकृत 'ॲप स्टोअर'वरूनच ॲप्स डाऊनलोड करा.
डेटा बॅकअप: संभाव्य धोका टाळण्यासाठी आपल्या महत्त्वाच्या डेटाचा वेळोवेळी बॅकअप घेत राहा.