Ashadhi Wari 2026: सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून नदीवरील सर्व 4 पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याशिवाय तिथून पालखी सोहळा पुढे नेणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून यंदा पालखीच्या मार्गात अभूतपूर्व बदल करण्यात आला आहे.
पुलांच्या तपासणीचा अहवाल अनुकूल न आल्यास, पालखी सोहळा मरकळ रोडने चऱ्होली फाट्यावर आणला जाईल. त्यानंतर दिघी आणि विश्रांतवाडी मार्गे हा सोहळा पुणे शहरात प्रवेश करेल. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी वारीतील सर्व भाविक आणि दिंडी प्रमुखांनी यंदा चऱ्होली फाट्यावरूनच सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी केले आहे.
प्रस्थान सोहळ्याच्या वेळेत बदल; गर्दी नियंत्रणासाठी दिंड्यांच्या प्रवेशावर मर्यादा
माऊलींचा हा ऐतिहासिक प्रस्थान सोहळा आज बुधवार, 8 जुलै रोजी दुपारी 3:00 वाजता पार पडणार आहे. पूर परिस्थिती आणि पावसाचे सावट पाहता मंदिर प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. सुरुवातीला रथासमोरील 1 ते 27, रथामागील 1 ते 20 आणि इतर पोटधारक अशा एकूण 56 दिंड्यांमधील केवळ 10 प्रतिनिधींनाच मंदिरात प्रवेश देण्याचे नियोजन होते.
मात्र, वारकऱ्यांची भावना लक्षात घेऊन या नियोजनात अंशतः बदल करण्यात आला असून, आता प्रस्थान सोहळ्यादरम्यान मानाच्या प्रत्येक दिंडीतील 50 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पावसामुळे बाधित झालेल्या मंदिर परिसरातील भागाची डागडुजी करण्यात येणार आहे.