El Nino Godzilla: रामायणातील लंका प्रवासादरम्यान हनुमानाचा मार्ग अडवणाऱ्या 'सुरसा' नावाच्या महाकाय सागरी राक्षसीची कथा सर्वश्रुत आहे. आज हवामान क्षेत्राच्या रूपाने तीच 'सुरसा' पुन्हा एकदा 'एल निनो' (El Nino) या महाकाय हवामान प्रणालीच्या रूपात जगासमोर उभी ठाकली आहे. या भीषण हवामान बदलाला शास्त्रज्ञांनी 'गॉडझिला एल निनो' असे नाव दिले असून, संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने (WMO) वर्तवलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबर 2026 मध्ये हा प्रभाव सर्वोच्च पातळीवर पोहोचेल. या परिस्थितीमुळे 2026 चा उत्तरार्ध आणि संपूर्ण 2027 हे वर्ष जागतिक पातळीवर प्रचंड उष्णतेचे आणि दुष्काळाचे ठरण्याची भीती असून, भारतीय मान्सून कोरडा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नेमका काय आहे हा 'गॉडझिला एल निनो'?
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान अनपेक्षितपणे वाढणे म्हणजे 'एल निनो' होय. हा 'एल निनो-सदर्न ऑसिलेशन' (ENSO) चाच एक भाग आहे. सामान्य स्थितीत व्यापारी वारे (trade winds) पश्चिमेकडे वाहतात आणि उबदार पाणी आशियाकडे ढकलतात. मात्र, एल निनोच्या काळात हा हवेचा दाब कमी होतो. महासागराच्या पृष्ठभागाचा अथांग भाग तापल्यामुळे जागतिक सरासरी तापमान नेहमीपेक्षा किमान 2°C ने वाढते. जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) माहितीनुसार, वर्षाच्या मध्यापर्यंत एल निनो सक्रिय होण्याची शक्यता 80 टक्के आहे, तर वर्षाच्या उत्तरार्धात हा धोका 90 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
भारतीय मान्सूनवर संकट; हवामान खात्याने घटवला पावसाचा अंदाज
एल निनोचा थेट फटका दक्षिण आशिया, विशेषतः भारताला बसण्याची चिन्हे आहेत. या काळात आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि मध्य आफ्रिकेत तीव्र उष्णतेच्या लाटा, वणवे आणि भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. भारतात यामुळे मान्सून कमालीचा कमकुवत होतो. ही गंभीर परिस्थिती पाहता भारतीय हवामान विभागाने (IMD) या वर्षासाठीच्या पावसाच्या अंदाजात सुधारणा केली असून, अपेक्षित सरासरी 92 टक्केवरून थेट 90 टक्क्यांपर्यंत खाली आणली आहे. पावसाचे हे प्रमाण घटल्यास देशांतर्गत शेती आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.
'पॉझिटिव्ह आयओडी'मुळे संकटाची तीव्रता अधिक वाढणार
एडिनबर्ग आणि युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया (UEA) मधील हवामान तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या वादळांचा विळखा जागतिक हवामानावर विपरीत परिणाम करेल. यामुळे एका बाजूला अमेरिका, मेक्सिको, इक्वेडोर आणि पेरूच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि पूर येईल, तर दुसरीकडे आशिया खंडात कोरडा दुष्काळ पडेल. या संकटात आणखी भर घालणार आहे ती म्हणजे 'पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल' (IOD) ही हिंदी महासागरातील स्थिती. 'आयओडी' आणि 'एल निनो' हे दोन्ही घटक एकत्र आल्यास इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामधील दुष्काळाची तीव्रता अधिक भयानक होईल आणि त्याचा अप्रत्यक्ष फटका भारतालाही बसेल.