Women's ODI Series Schedule: भारतीय महिला क्रिकेट संघासाठी वर्षाचा शेवट अत्यंत अटीतटीचा आणि रोमांचक ठरणार आहे. 'क्रिकेट दक्षिण आफ्रिका'ने (CSA) आगामी घरगुती हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले असून, यामध्ये भारतीय महिला संघाच्या दौऱ्याचा समावेश आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामने आणि एक ऐतिहासिक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. महिला क्रिकेटमधील दोन दिग्गज संघ आमनेसामने येणार असल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
6 डिसेंबरपासून दौऱ्याला सुरुवात; 'कसोटी' ठरणार मुख्य आकर्षण
भारतीय संघाच्या या मोहिमेची सुरुवात 6 डिसेंबर रोजी बेनोनी येथे दक्षिण आफ्रिका इमर्जिंग टीमविरुद्धच्या सराव सामन्याने होईल. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामना, जो 20 ते 23 डिसेंबर दरम्यान 'गकेबेर्हा' येथे खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा आतापर्यंतचा चौथा कसोटी सामना ठरेल. त्यापूर्वी, उभय संघांमध्ये 9 ते 15 डिसेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे सर्व वनडे सामने 'आयसीसी महिला चॅम्पियनशिप'चा भाग असल्याने जागतिक क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे असतील.
ऑस्ट्रेलियाचा संघही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
भारताचा दौरा संपल्यानंतर, नवीन वर्षात म्हणजे 18 मार्च ते 11 एप्रिल 2027 या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा महिला संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर येणार आहे. या 'मल्टी-फॉर्मेट' मालिकेमध्ये तीन टी-20, तीन एकदिवसीय सामने आणि एक कसोटी सामना खेळवला जाईल. यातील अंतिम एकदिवसीय सामना 'ब्लॅक डे' (Black Day) म्हणून साजरा केला जाणार असून क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने महिला क्रिकेटच्या प्रचारासाठी जय्यत तयारी केली आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) फोलेत्सी मोसेकी यांनी या दौऱ्यांविषयी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "भारत आणि ऑस्ट्रेलिया या जगातील दोन सर्वोत्तम संघांचे यजमानपद भूषवणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. हा हंगाम दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासाठी ऐतिहासिक ठरेल. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळ पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार असून, मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहून संघाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आम्ही करत आहोत."