MSV Virat 1: ओमानमधील 'रास अल हद्द' किनारपट्टीपासून सुमारे 80 नॉटिकल मैल अंतरावर 'एमएसव्ही विराट 1' (MSV Virat 1) हे भारतीय खलाशी असलेले 'धो' (पारंपरिक पद्धतीचे जहाज) बुडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जहाज बुडण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळताच अरबी समुद्रात युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवण्यात आली. अमेरिकन नौदलाने या घटनेला दुजोरा दिला असून जहाजावरील सर्व 14 भारतीय खलाशी गंभीर संकटात सापडले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलत त्या सागरी क्षेत्रात तैनात असलेली भारतीय नौदलाची युद्धनौका घटनास्थळाकडे रवाना केली.
अमेरिकन नौदलाची तत्परता
या आंतरराष्ट्रीय बचाव मोहिमेत अमेरिकन नौदलाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. माहिती मिळताच अमेरिकन नौदलाचे 'पी-8' हे सागरी गस्ती विमान सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी समुद्रात बुडत असलेल्या जहाजावरील खलाशांसाठी विमानाधारे 'लाइफ राफ्ट' (जीवरक्षक नौका) खाली सोडली. या गस्ती विमानाने आकाशातून संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले होते. अमेरिकन नौदलाच्या या समयसूचकतेमुळे सर्व 14 खलाशांचा जीव वाचला.
व्यापारी जहाजानेही बदलला मार्ग; मदतीचा हात
भारतीय खलाशांना वाचवण्यासाठी केवळ नौदलच नाही, तर त्या परिसरातून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजानेही मदतीचा हात पुढे केला. 'सेंट किट्स अँड नेव्हिस'चा ध्वज असलेले 'एमव्ही जबाळपूर अली 9' (MV Jabalpur Ali 9) हे मालवाहू जहाज ओमानमधील सोहार बंदराहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. मात्र, भारतीय जहाज संकटात असल्याचे समजताच या जहाजाच्या कॅप्टनने आपला पूर्वनियोजित मार्ग बदलला आणि ते थेट बुडणाऱ्या जहाजाच्या दिशेने मदतीसाठी रवाना झाले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे सर्व खलाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.