India Gold Reserves : जागतिक स्तरावर वाढता भू-राजकीय तणाव आणि इराण-इस्रायल युद्धाच्या छायेत भारताने आपल्या सोन्याच्या साठ्याबाबत एक अत्यंत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लंडन आणि न्यूयॉर्कमधील तिजोऱ्यांमधून आपले सोने वेगाने हलवण्यास सुरुवात केली असून, आता भारताच्या एकूण साठ्यापैकी सुमारे 77 टक्के सोने देशांतर्गत तिजोरीत सुरक्षित आहे. 'ज्यांच्याकडे सोने, त्यांचेच राज्य' या उक्तीनुसार, भारताने आतापर्यंत जवळपास 680 टन सोने मायदेशी आणले असून, यामुळे बँक ऑफ इंग्लंडमधील भारताचा साठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
सुरक्षेची नवी व्याख्या आणि आरबीआयचा अहवाल
आरबीआयच्या ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील ताज्या अहवालानुसार, भारताकडे एकूण 880.52 टन सोन्याचा साठा आहे. यापैकी 680 टन सोने आता भारतात असून, केवळ 197.67 टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे शिल्लक आहे. उर्वरित 2.8 टन सोने डिपॉझिट स्वरूपात ठेवण्यात आले आहे. केवळ गेल्या 6 महिन्यांत रिझर्व्ह बँकेने 104.23 टन सोने परदेशातून भारतात आणले आहे; हे भारताच्या वाढत्या आर्थिक स्वावलंबनाचे प्रतीक मानले जात आहे.
परदेशातून सोने हलवण्यामागची महत्त्वाची कारणे
रशिया-युक्रेन युद्ध आणि पाश्चात्य देशांनी अफगाणिस्तानची मालमत्ता गोठवल्यानंतर जागतिक स्तरावर 'विश्वासाचे संकट' निर्माण झाले आहे. राजकीय कारणांमुळे आणि बदलत्या परिस्थितींमुळे परदेशात ठेवलेले सोने कधीही अडकू शकते, अशी भीती केंद्रीय बँकांना वाटू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने आपली रणनीती बदलली असून, संकटाच्या काळात सोन्याचा त्वरित वापर करता यावा, यासाठी ते आपल्याच नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला आहे. मार्च 2023 मध्ये भारताचे केवळ 37 टक्के सोने देशात होते, जे आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
गुंतवणूक नव्हे तर 'सुरक्षा विमा'
तज्ज्ञांच्या मते, बदलत्या जागतिक आर्थिक व्यवस्थेत सोने आता केवळ गुंतवणूक राहिलेले नसून तो एक 'सुरक्षा विमा' बनला आहे. भारताच्या एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा आता 13.9 टक्क्यांवरून 16.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. भारताचा एकूण परकीय चलन साठा सध्या 691.1 अब्ज डॉलर असून, त्यात सोन्याचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. पूर्वी ट्रेडिंगची सुलभता आणि तरलतेसाठी सोने लंडनमध्ये ठेवले जात असे, मात्र आता सुरक्षिततेची व्याख्या 'स्वतःच्या नियंत्रणाखालील संपत्ती' अशी झाली आहे.
न्यूयॉर्क-लंडनच्या तिजोऱ्या ओस पडणार?
आपले सोने परत आणणारा भारत हा एकमेव देश नाही. जगातील अनेक देश आता लंडन आणि न्यूयॉर्कवर विसंबून राहण्याऐवजी आपली मालमत्ता मायदेशी आणत आहेत. सध्या लंडन आणि न्यूयॉर्कची स्थिती बिघडलेली नाही. मात्र जागतिक शक्तींमधील वाढता तणाव पाहता, सोन्याचा मोठा हिस्सा देशात ठेवून आणि काही भाग परदेशात ठेवून भारत एक उत्तम संतुलन साधत आहे. या निर्णयामुळे भारताची आर्थिक पत तर वाढलीच आहे, पण जागतिक मंचावर भारताने आपली स्वायत्तता आणि भविष्यातील संकटांशी लढण्याची तयारीही सिद्ध केली आहे.
हेही वाचा – Iran-US Ceasefire: इराण-अमेरिका युद्धाला पूर्णविराम? ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण 'ही' अट कायम