T20 World Cup 2026: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजची रात्र दिवाळी साजरी करण्यासारखी ठरली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने दिलेल्या 256 धावांच्या अवाढव्य लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणासमोर पत्त्यासारखा कोसळला. या विजयासह भारताने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वावर आपले वर्चस्व सिद्ध करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे.
जसप्रीत बुमराहचा ‘मॅजिक स्पेल’ आणि किवींचे कंबरडे मोडले
न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या कर्णधार मिशेल सँटनरला 43 धावांवर बाद करत जसप्रीत बुमराहने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी बुमराहने एकाच षटकात 2 चेंडूंवर 2 बळी घेत सामन्याचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवले होते. त्याने प्रथम घातक ठरू शकणाऱ्या जिमी नीशमला बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर मॅट हेन्रीला तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडची अवस्था 8 बाद 142 अशी झाली आणि संपूर्ण किवी संघ बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर हतबल दिसला.
मॅचचा टर्निंग पॉइंट आणि भारताचे वर्चस्व
सामन्यात जेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 128 होती, तेव्हा डॅरिल मिशेल (17) इशान किशनच्या हाती झेल देऊन बाद झाला. हा या डावातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला आणि तिथूनच न्यूझीलंडचा पराभव निश्चित मानला जाऊ लागला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन, इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफानी फटकेबाजीमुळे भारताने 20 षटकांत 255 धावांचा डोंगर उभा केला होता. 256 धावांचे हे विक्रमी लक्ष्य पार करणे न्यूझीलंडला जमले नाही आणि त्यांचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले.
?.?.?.?.?.?.?.?.? ??#TeamIndia clinch a record 3️⃣rd ICC Men's #T20WorldCup title ? Take. A. Bow ?#MenInBlue | #Final | #INDvNZ pic.twitter.com/nml1AZY5tK — BCCI (@BCCI) March 8, 2026
अहमदाबादमध्ये जल्लोष; भारताचा तिरंगा फडकला
जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीसोबतच अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनीही योग्य वेळी गडी बाद करत न्यूझीलंडवर दडपण कायम ठेवले. सामना संपताच मैदानात उपस्थित असलेल्या लाखो चाहत्यांनी एकच जल्लोष केला. संपूर्ण देशात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांमध्ये हा विजय साजरा केला जात आहे. या विजयाने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे.