IND vs AFG: ‘इंडिया ए’ संघाने त्रिकोणी मालिकेत दमदार कामगिरी करत ‘अफगाणिस्तान ए’ संघाचा 101 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या शानदार विजयामुळे भारतीय संघाने गुणतालिकेत 4 गुणांसह अव्वल स्थान गाठले असून अंतिम सामन्यातील आपले स्थान पक्के केले आहे. आता जेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना कोणाशी होणार, याचा फैसला श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी सामन्याच्या निकालावरून होईल. या शर्यतीत भारत आणि श्रीलंका यांच्यातच अंतिम सामना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय संघाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान
अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे भारताचा ‘नेट रन रेट’ श्रीलंकेपेक्षा सरस झाला आहे. ताज्या गुणतालिकेनुसार, भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 2 सामन्यांत विजय मिळवला असून 2 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या भारताच्या खात्यात 4 गुण आणि 0.797 इतका मजबूत ‘नेट रन रेट’ आहे. दुसऱ्या स्थानावर असलेला श्रीलंका संघ 3 सामन्यांत 4 गुणांसह असून त्यांचा ‘नेट रन रेट’ 0.494 इतका आहे.
अफगाणिस्तानसमोरील अंतिम फेरीत पोहोचण्याचे कठीण आव्हान
सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानने 3 सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकला असून त्यांच्याकडे 2 गुण आहेत. त्यांचा ‘नेट रन रेट’ सध्या -1.983 असा घसरलेला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तानला केवळ श्रीलंकेवर विजय मिळवून चालणार नाही, तर तो विजय अत्यंत मोठ्या फरकाने मिळवावा लागेल. जर अफगाणिस्तानने अगदी कमी फरकाने विजय मिळवला, तरीही सरस रन रेटच्या जोरावर श्रीलंकाच अंतिम फेरीत पोहोचेल. मात्र, अफगाणिस्तानने चमत्कारीक कामगिरी करत श्रीलंकेचा रन रेट मागे टाकला, तरच त्यांना भारतासोबत अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल.
हेही वाचा – Shubman Gill ODI Century: कर्णधार म्हणून शुभमन गिलचा पहिला धमाका; अफगाणिस्तानविरुद्ध ठोकलं शानदार शतक
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष; 21 जूनला रंगणार महामुकाबला
अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने येण्याची शक्यता जास्त असल्याने, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा श्रीलंकेच्या गोलंदाजांचा सामना करताना दिसू शकतो. या महत्त्वाच्या सामन्यातील त्याच्या फलंदाजीकडे क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष असेल. या स्पर्धेतील दुसरा फायनलिस्ट संघ कोण असेल, हे शुक्रवार, 19 जून रोजी होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यानंतर स्पष्ट होईल. त्यानंतर, 21 जून रोजी या त्रिकोणी मालिकेचा अंतिम सामना खेळवला जाईल.
INTO THE FINALS ? India A clinch a magnificent 1️⃣0️⃣1️⃣-run win over Afghanistan A to book their spot in the finals of the #TriNationSeries ? Scorecard ▶️ https://t.co/Kg9IWt7M5b#INDAvAFGA pic.twitter.com/kZ6YL4ngod — BCCI (@BCCI) June 17, 2026
भारताच्या 319 धावा, अफगाणिस्तानचा डाव 219 धावांत आटोपला
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 319 धावांचा विशाल डोंगर उभा केला होता आणि अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 320 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने एका टप्प्यापर्यंत चांगली झुंज दिली आणि ते विजयाच्या शर्यतीत असल्यासारखे वाटत होते. मात्र, 25 व्या षटकानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत लागोपाठ विकेट्स घेतल्या. परिणामी, अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 36.5 षटकांत केवळ 219 धावांवर गारद झाला.