Palghar News : डिजिटल इंडिया आणि प्रगतीच्या गप्पा मारल्या जात असताना पालघरच्या दुर्गम भागातील एक भीषण वास्तव समोर आले आहे. जव्हार तालुक्यातील तिलोंडा (आंबेपाडा) येथे रस्ता नसल्याने शैलेश मगन वागदडा या 18 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. वेळेवर उपचार न मिळाल्याने एका कोवळ्या तरुणाचा झोळीतच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
शैलेशची प्रकृती मंगळवारी पहाटे अचानक खालावली. गावात दवाखाना नाही आणि रुग्णवाहिका येण्यासाठी रस्ताही नाही. अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी लाकडाला कापड बांधून त्याची झोळी केली आणि त्याला खांद्यावर घेऊन डोंगरवाटा तुडवत रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, उपचारांसाठी होणारा विलंब शैलेशच्या जीवावर बेतला आणि वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा – Ajit Pawar Last Video: अजितदादांचा विमान अपघाताआधीचा ‘तो’ शेवटचा व्हिडिओ आला समोर; काय म्हणाले होते ? पाहा
आदिवासी पाड्यांची ‘जैसे थे’ परिस्थिती
तिलोंडा (आंबेपाडा) हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. पावसाळ्यात तर या गावाचा जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. “आम्ही अनेकदा रस्ते आणि आरोग्यासाठी मागणी केली, पण सरपंच आणि प्रशासनाने फक्त आश्वासने दिली, काम काहीच झाले नाही,” असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. चारचाकी वाहन गावात येऊ शकत नसल्याने गंभीर रुग्णांना झोळीत नेण्याशिवाय ग्रामस्थांकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.
Palghar – जव्हारमध्ये रस्त्याअभावी तरुणाचा मृत्यू, मृतदेह झोळीत टाकून 3 किमीची पायपीट
पालघर मध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव पुन्हा एकदा उघड . जव्हारच्या तिलोंडा येथे रस्त्या अभावी वेळेत उपचार न मिळाल्याने अठरा वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. शैलेश मगन वागदडा या 18 वर्षे तरुणाचा… pic.twitter.com/yJiyJoNSPT — Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) February 5, 2026
राजकीय प्रतिक्रिया आणि आंदोलनाचा इशारा
या घटनेनंतर विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी सांगितले की, “विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात रस्ते व्हावेत, यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निधीची मागणी केली आहे.” दरम्यान, आता एका तरुणाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित करत गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.