Monsoon : मान्सूनचे त्रिकूट! एल निनो, ला निना आणि एमजेओचा भारतीय पावसावर मोठा परिणाम; नव्या संशोधनातून धक्कादायक वास्तव समोर

भारतातील अतिवृष्टीच्या पॅटर्नमध्ये (पावसाच्या वितरणात) कमालीचे आणि मोठे बदल होत असल्याचे या संशोधनातून उघड झाले आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ..

Monsoon : मान्सूनचे त्रिकूट! एल निनो, ला निना आणि एमजेओचा भारतीय पावसावर मोठा परिणाम; नव्या संशोधनातून धक्कादायक वास्तव समोर

Impact of El Nino and La Nina on Indian Monsoon : भारतीय मान्सूनच्या लहरीपणाचा अचूक माग काढण्यासाठी हवामान शास्त्रज्ञांनी एक अत्यंत महत्त्वाचे संशोधन केले आहे. 'एल निनो', 'ला निना' आणि हिंदी महासागरातील ढग-वाऱ्यांचे चक्र म्हणजेच 'मॅडन ज्युलिअन ऑसिलेशन' (MJO) यांच्यातील अंतर्गत गुंतागुंतीच्या परस्परसंबंधांमुळे भारतातील अतिवृष्टीच्या पॅटर्नमध्ये (पावसाच्या वितरणात) कमालीचे आणि मोठे बदल होत असल्याचे या संशोधनातून उघड झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) शास्त्रज्ञांनी केलेल्या या ताज्या अभ्यासामुळे आगामी काळात पावसाचा अचूक अंदाज लावणे आणि पूर व्यवस्थापन करणे अधिक सोपे होणार आहे.

हवामान विभागाच्या वैज्ञानिकांचे संशोधन; 90 टक्के अचूकतेचा दावा
आयएमडीचे (IMD) प्रकल्प वैज्ञानिक अरविंद पागिरे, सत्यबान बी. रत्ना, ॲनालिसा चेर्ची, एस. डी. सानप आणि ओ. पी. श्रीजिथ यांच्या पथकाने हा महत्त्वपूर्ण अभ्यास केला आहे. त्यांचे हे संशोधन 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लायमेटॉलोजी' या जगप्रसिद्ध संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. वैज्ञानिकांनी वर्ष 1979 ते 2023 या तब्बल 44 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीतील हवामान डेटाचे सखोल सांख्यिकीय विश्लेषण केले असून, हे निष्कर्ष 90 टक्के अचूक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

'एल निनो' काळात उत्तर भारतात पुराचा धोका; असे बदलते गणित
बाष्प खेचले जाते: पॅसिफिक महासागराच्या पाण्याचे तापमान वाढते, तेव्हा त्याला 'एल निनो' स्थिती म्हणतात. या काळात सर्वसाधारणपणे देशातील अतिवृष्टीच्या घटनांमध्ये 20 ते 40 टक्क्यांची घट नोंदवली जाते.
गंगेच्या मैदानात अतिवृष्टी: परंतु, 'एल निनो' सक्रिय असतानाच हिंदी महासागरातून पूर्वेकडे सरकणारे 'एमजेओ' ढगांचे चक्र जर विशिष्ट अशा 4 थ्या आणि 5 व्या टप्प्यात आले, तर पावसाचे चित्र उलटे होते. या स्थितीत बंगालच्या उपसागराकडून येणारे सर्व बाष्प उत्तर भारताकडे वेगाने खेचले जाते. परिणामी, उत्तर भारतातील गंगेच्या मैदानी प्रदेशात कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन तिथे पूर येण्याइतकी भयानक अतिवृष्टी होते.

हेही वाचा – Godzilla El Nino: हवामान विभागाचा मोठा इशारा; देशावर 'गॉडझिला'चे संकट; पुढील 3 महिन्यात नेमकं काय घडणार?

'ला निना' आणि दक्षिण भारतातील 40 टक्के अतिवृष्टीचा संबंध
याउलट, जेव्हा पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा थंड होते, तेव्हा त्या स्थितीला 'ला निना' म्हटले जाते. संशोधनातील निष्कर्षानुसार, जेव्हा देशात 'ला निना' परिस्थिती सक्रिय असते, तेव्हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये ढगफुटी आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता थेट 40 टक्क्यांहून अधिक वाढते. या काळात दक्षिण भारतातील नद्यांना पूर येणे आणि किनारी भागांमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याचे प्रमाण वाढते.

'एमजेओ'च्या 4 थ्या आणि 5 व्या टप्प्यात नेमके काय घडते?
'मॅडन ज्युलिअन ऑसिलेशन' (MJO) हे प्रामुख्याने हिंदी महासागरातून आकाशात निर्माण होणारे बाष्पयुक्त ढगांचे एक फिरते चक्र आहे. 'ला निना' सुरू असताना जेव्हा हे चक्र आपल्या 4 थ्या आणि 5 व्या टप्प्यात प्रवेश करते, तेव्हा मान्सूनचा संपूर्ण जोर उत्तर भारताऐवजी थेट दक्षिण भारताचा द्विपकल्पीय भाग आणि किनारपट्टीच्या प्रदेशाकडे सरकतो. यामुळेच दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या घटनांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत अचानक वाढ होते, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन आणि पूर नियोजनासाठी महत्त्वाचे निष्कर्ष
या संशोधनामुळे 'एन्सो' (एल निनो सदर्न ऑसिलेशन) आणि 'एमजेओ' यांच्या संयुक्त प्रभावाचा एकत्रित अभ्यास करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे भविष्यातील नैसर्गिक आपत्तींचा धोका अधिक स्पष्टपणे ओळखता येईल. विशेषतः दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील पूर व्यवस्थापन, प्रशासकीय आपत्ती नियोजन आणि जोखीम मूल्यांकनासाठी (Risk Assessment) हे निष्कर्ष अत्यंत दिशादर्शक आणि उपयुक्त ठरणार असल्याचे प्रकल्प वैज्ञानिक अरविंद पागिरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Weather Update : मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली! अरबी समुद्राकडून येणारे वारे वेगवान झाल्यामुळे कोकण किनारपट्टीला IMD चा मोठा अलर्ट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number