Himachal Pradesh Accident : हिमाचल आणि उत्तराखंडच्या सीमावर्ती भागात आज सकाळी मोठा अपघात झाला. हिमाचल पथ परिवहन निगमच्या (HRTC) बसला झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. शिमला जिल्ह्यातील चौपाल उपमंडळातून पाँटा साहिबच्या दिशेने जाणारी ही बस उत्तराखंडमधील कालसी जवळील कुआनु-मीनाक मार्गावर अचानक खोल दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
असा घडला भीषण अपघात
नेरवा डेपोची ही बस (क्रमांक HP-66A-2588) मंगळवारी सकाळी साधारण 6:30 वाजता चौपालहून पाँटा साहिबसाठी निघाली होती. सकाळी 10:00 च्या सुमारास ही बस उत्तराखंडमधील कालसी भागातील सुदोई खाड जवळ पोहोचली. हा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या एका ट्रकला ‘पास’ होण्यासाठी जागा देताना बस चालकाने गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने डोंगराची कडा खचली आणि चालकाचा ताबा सुटल्याने प्रवाशांनी भरलेली ही बस थेट खोल दरीत कोसळली.
दुर्गम भागात बचावकार्यासाठी यंत्रणांची धावपळ
अपघात झालेला भाग अत्यंत खोल दरीचा आणि दुर्गम असल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडथळे येत होते. घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड राज्य आपत्ती निवारण दलाच्या (SDRF) डाकपत्थर, चकराता आणि त्यूणी येथील तुकड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दोरखंडांच्या साहाय्याने दरीत उतरून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. चिखल, झाडे-झुडपे आणि अरुंद वाटांमुळे जखमींना रस्त्यापर्यंत आणताना बचाव पथकांना मोठी शर्थ करावी लागली.
दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून दखल
या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री धामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून जखमींना तातडीने उपचार मिळतील याची खात्री केली. तसेच, गंभीर जखमी प्रवाशांना गरज भासल्यास विमानातून मोठ्या रुग्णालयात हलवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी देखील शिमला आणि सिरमौर येथील HRTC अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चौपाल से वाया उत्तराखंड पांवटा साहिब जा रही हिमाचल पथ परिवहन निगम (HRTC) की बस के उत्तराखंड के क्वाणु में (पास लेते हुए, डंगा बैठने से) गहरी खाई में गिरने की अत्यंत दु:खद सूचना प्राप्त हुई है। प्राप्त जानकारी के अनुसार इस हादसे में 3 लोगों की दु:खद मृत्यु की सूचना है। बस में… pic.twitter.com/elhsAsXot6 — Mukesh Agnihotri (@Agnihotriinc) February 3, 2026
जखमींवर उपचार आणि सद्यस्थिती
जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये नेमके कोण आहेत, याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत असून मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात येत आहे. बसचा वाहक जगदीश चंद याने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते. या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, डोंगराळ भागातील अरुंद रस्त्यांवरील धोकादायक प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Devastating news from Kwanu-Minas road in Dehradun. HRTC bus with over 30 passengers met with an accident in Kalsi, Uttarakhand. 3 people confirmed dead (2 women, 1 man) and nearly 35 injured. Locals are helping with rescue ops rn. This is just tragic. ? pic.twitter.com/xU2OLQLOoi — Himalayan Hindu (@himalayanhindu) February 3, 2026