Special Intensive Revision campaign : तुम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, मेघालय किंवा झारखंड या राज्यांमध्ये राहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहीम सुरू केली आहे. 30 जून ते 29 जुलै या महिनाभराच्या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार आहे. यादरम्यान, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) थेट तुमच्या घरी येतील. या मोहिमेचा मुख्य उद्देश सर्व पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे आणि बोगस किंवा अपात्र नावे यादीतून काढून टाकणे हा आहे.
मोहिमेचे महत्त्वाचे वेळापत्रक (Important Dates)
निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदारांनी खालील प्रमुख तारखा लक्षात ठेवणे गरजेचे आहे:
30 जून ते 29 जुलै: बीएलओ (BLO) तुमच्या घरी येऊन माहिती अर्ज देतील आणि गोळा करतील.
5 ऑगस्ट: निवडणूक आयोगातर्फे प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर: मतदार यादीतील नावांवर हरकती किंवा दावे नोंदवण्यासाठी मुदत दिली जाईल.
7 ऑक्टोबर: अखेरची आणि अंतिम मतदार यादी (Final Electoral Roll) जाहीर केली जाईल.
मतदारांच्या शंका आणि निवडणूक आयोगाची नियमावली
या मोहिमेदरम्यान मतदारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, ज्यांची उत्तरे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार खालीलप्रमाणे आहेत:
– नाव आधीच असेल तर आणखी काही करावे लागते का?: तुमचे नाव आधीपासून यादीत असले, तरी बीएलओ आल्यावर तुम्हाला माहिती अर्ज भरावाच लागेल. या अर्जाची एक प्रत त्यांच्याकडे देऊन, दुसरी पोहोच पावती (Acknowledgement) स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.
– कागदपत्रे जमा करावी लागतील का?: नाही. हा माहिती अर्ज भरताना तुम्हाला आधार, पासपोर्ट किंवा कोणत्याही ओळखपत्राची प्रत जोडण्याची किंवा जमा करण्याची अजिबात गरज नाही, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
– घर बंद असल्यास काय होईल?: तुमचे घर बंद असल्यास बीएलओ तिथे अर्ज ठेवून जातील. तो अर्ज गोळा करण्यासाठी ते पुढील काही दिवसांत किमान 3 वेळा तुमच्या घरी भेट देतील.
– ऑनलाईन अर्ज भरता येईल का?: होय. जर तुम्हाला बीएलओची वाट पाहायची नसेल, तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत मतदार पोर्टलवर जाऊन स्वतः ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरू शकता.
– जुना तपशील कसा शोधावा?: जर तुम्हाला जुन्या यादीतील तपशील आठवत नसेल, तर मतदार ओळखपत्र क्रमांक, तुमचे नाव किंवा मतदान केंद्राच्या मदतीने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तो शोधता येईल.
लग्नानंतर नाव बदलले असल्यास कोणाचा तपशील द्यावा?: जर तुमचे लग्न झाले असेल आणि मागील पडताळणीत नाव नसेल, तर फॉर्ममध्ये सासरच्या ऐवजी तुमच्या आई-वडिलांचा किंवा आजी-आजोबांचा (माहेरचा) तपशील देणे आवश्यक आहे.
अडचण आल्यास कुठे संपर्क साधाल?
जर तुमच्या मतदार यादीतील तपशिलात काही चूक आढळली किंवा नोंदणीबाबत मनात काही शंका असेल, तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या 1950 या टोल-फ्री मतदार हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून थेट मदत मिळवू शकता. याव्यतिरिक्त, तुमच्या जवळच्या मतदार केंद्राला किंवा जिल्हा निवडणूक कार्यालयाला भेट देऊनही तुमच्या शंकांचे निरसन करता येईल.