New Year 2026 Celebration : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री नागरिकांच्या मनोरंजनासाठी राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी आता वेळेचे बंधन अडथळा ठरणार नाही.
हेही वाचा – Gold Silver Rate: नवीन वर्षाआधीच मोठी खुशखबर! सोनं -चांदीच्या दरात घसरण; तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या
नियमावली आणि अटी
शासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही सवलत सरसकट सर्वांना लागू नसेल. पहाटेपर्यंत सेलिब्रेशनची ही सवलत केवळ बंदिस्त सभागृहे, हॉटेल्सच्या आतील हॉल आणि इनडोअर रेस्टॉरंट्ससाठीच मर्यादित आहे. तथापी, टेरेस, मोकळी मैदाने किंवा लॉन्सवर होणाऱ्या कार्यक्रमांना ही वेळ मर्यादा लागू असणार नाही. अशा खुल्या ठिकाणांवरील कार्यक्रमांसाठी स्थानिक पोलिसांच्या आधीच्या नियमांचेच पालन करावे लागेल.
हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस तैनात
जल्लोषाच्या वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या चौकात कडक नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांवर आणि ड्रग्जच्या विळख्यात अडकणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर असेल. नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करावे, मात्र जल्लोष करताना कायद्याची चौकट मोडू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं आवाहन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलं आहे.