Crime News: ताजमहालच्या नगरीत एका कौटुंबिक वादाने भीषण वळण घेतले असून, केवळ मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाला संपवलं. आग्र्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘तिला मैथान’ परिसरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. 30 वर्षीय गौरव शर्मा असे मृताचे नाव असून, त्याचा धाकटा भाऊ आकाश याने अत्यंत क्रूरपणे त्याच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नात्यांमधील वाढती हिंसा पुन्हा एकदा समोर आली आहे.
क्षुल्लक वादातून मध्यरात्री मृत्यूचं तांडव
घटनेच्या रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र जेवल्यानंतर आपापल्या खोलीत झोपायला गेले होते. मात्र, मध्यरात्री आकाशने गौरवकडे त्याचा मोबाईल मागितला. गौरवने मोबाईल दिला, पण पासवर्ड सांगण्यास नकार दिला. हीच बाब आकाशच्या संतापाचा कडेलोट ठरली. संतापाच्या भरात त्याने घराच्या वाटणीचा जुना मुद्दा उकरून काढला आणि मोठ्या भावावर काठ्यांनी हल्ला चढवला. क्रूरतेची सीमा ओलांडत त्याने जवळच असलेला एक एलईडी टीव्ही उचलला आणि थेट गौरवच्या डोक्यात आपटला. जेव्हा आई पूनम शर्मा या मध्यस्थी करण्यासाठी धावून आल्या, तेव्हा नराधम आकाशने त्यांनाही जोराने ढकलून दिले.
व्यसन आणि जुगाराने उद्धवस्त केले कुटुंब
मयत गौरवची आई पूनम या एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पतीचे निधन होऊन अवघे पाच महिने झाले असतानाच या घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश हा मुंबईतील नोकरी सोडून आग्रा येथे परतला होता आणि तो जुगार तसेच अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. घराची वाटणी करून पैसे मिळवण्यासाठी तो सातत्याने मोठ्या भावाशी वाद घालत असे. “मी थोरल्या मुलासाठी वधू शोधत होते, पण घरात सनई-चौघडा वाजण्यापूर्वीच धाकट्या भावाने त्याचे जग संपवले,” असा टाहो पूनम यांनी फोडला.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात; फॉरेन्सिक तपास सुरू
घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आकाशला शेजाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गंभीर जखमी गौरवला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी भानू प्रताप सिंह यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळावरून रक्ताने माखलेले पुरावे आणि तुटलेल्या एलईडी स्क्रीनचे तुकडे जप्त केले आहेत. आईच्या तक्रारीवरून आकाशवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.