Crime News: मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर मौलवी आणि त्याच्या साथीदाराने सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सहारनपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, नशा आणणारे द्रव्य पाजून पीडितेवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी रविवारी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला असून प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे.
आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली फसवणूक
पीडित महिलेने सहारनपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) अभिनंदन सिंग यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त आहे. 15 एप्रिल रोजी तिच्याच गावातील एका तरुणाने तिला सिडकी गावातील मशिदीत एका मौलवीकडे मुलावर 'झाड-फूंक' (आध्यात्मिक उपचार) करण्यासाठी नेले. तेथे पोहोचल्यावर मौलवीने एका पाण्याच्या ग्लासमध्ये ताईत टाकून ते पाणी महिलेला प्यायला दिले. ते पाणी पिताच महिला बेशुद्ध पडली.
अत्याचार आणि व्हिडीओ बनवून धमकावले
महिलेने आरोप केला आहे की, ती बेशुद्ध असताना मौलवी आणि त्या तरुणाने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरण आणि छायाचित्रेही काढली. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने प्रतिकार केला असता, आरोपींनी तिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. जर ही घटना कोणाला सांगितली तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला गावाबाहेर सोडून देण्यात आले. घरी पोहोचल्यावर पीडितेने पतीला हा सर्व प्रकार सांगितला.
हेही वाचा – Crime News : खळबळजनक! प्रियकरासोबत राहण्यासाठी आईने पोटच्या मुलाला संपवलं; डोळ्यांत मिरची पूड टाकली अन्…
पोलीस तपासाला वेग; आरोपींचा शोध सुरू
या गंभीर घटनेची दखल घेत SSP अभिनंदन सिंग यांनी संबंधित पोलीस ठाण्याला सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक विनय शर्मा यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा सक्रियपणे शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.