Muzaffarpur Crime: बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पानापूर करियात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहाबाजपूर मठाजवळ एकाच कुटुंबातील तिघांना निर्घृणपणे संपवण्यात आलं. 30 वर्षीय महिला आणि तिच्या अवघ्या 2 वर्षांच्या मुलीसह 3 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह त्यांच्याच घरातील पलंगावर आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जमिनीच्या वादातून नातेवाईकांनीच हे कृत्य केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
पहाटे 3:30 वाजता उघडकीस आला प्रकार
मृतांची ओळख रीता देवी (वय 30), तिची मुलगी वैष्णवी (वय 2) आणि ३ महिन्यांचा मुलगा कन्हैया अशी झाली आहे. रीता देवी यांचे पती मिठाई लाल शाह हे केटरिंगचा व्यवसाय करतात. घटनेच्या रात्री ते एका लग्नाच्या वरातीत कामासाठी बाहेर गेले होते. पहाटे 3:30 च्या सुमारास जेव्हा ते घरी परतले, तेव्हा घराला बाहेरून कुलूप होते. कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, समोरचा देखावा पाहून त्यांना धक्काच बसला. पत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह पलंगावर निपचित पडले होते, तर जवळच एक दोरी आढळली. या दोरीने गळा आवळून त्यांना संपवल्याचा संशय आहे.
दोन मुले आजीसोबत असल्याने बचावली
या भीषण हत्याकांडातून मिठाई लाल यांची दोन मुले सुदैवाने बचावली आहेत. घटनेच्या वेळी ही दोन्ही मुले दुसऱ्या खोलीत त्यांच्या आजीसोबत (उर्मिला देवी) झोपलेली होती. मारेकऱ्यांनी केवळ एकाच खोलीला लक्ष्य केल्याने या मुलांचे प्राण वाचले. उर्मिला देवी यांनी अत्यंत संतप्त शब्दात आरोप केला आहे की, "जमिनीच्या वादातून गावातीलच काही नातेवाईकांनी माझ्या सुनेला आणि नातवंडांना संपवलं आहे. यापूर्वी माझ्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न झाला होता."
धमकी दिली होती, पण गांभीर्याने घेतली नाही
मिठाई लाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारीच त्यांना संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी मिळाली होती. मात्र, ही धमकी केवळ वादाचा भाग असावी असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. केवळ काही तासांतच ही धमकी वास्तवात उतरली आणि मिठाई लाल यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. आरोपींनी नियोजनबद्ध रितीने मिठाई लाल घरात नसतानाच हा हल्ला चढवला.
फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
घटनेची माहिती मिळताच डीएसपी (पश्चिम) सुचित्रा कुमारी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून संशयित नातेवाईकांची चौकशी सुरू केली आहे. "आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूची वेळ आणि पद्धत अधिक स्पष्ट होईल," असे पोलिसांनी सांगितले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस छापेमारी करत आहेत.