Hingoli Earthquake: हिंगोली आणि वसमत तालुक्याला मध्यरात्री भूकंपाचा जोरदार झटका; वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजली गेली आहे.

Hingoli Earthquake: हिंगोली आणि वसमत तालुक्याला मध्यरात्री भूकंपाचा जोरदार झटका; वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Hingoli Earthquake: मराठवाड्याच्या काही भागांत मध्यरात्रीच्या सुमारास जमिनीला तीव्र हादरे बसल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांनी औंढा नागनाथ तालुक्यासह आजूबाजूचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजली गेली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा आणि जलालदाभा या गावांच्या परिसरात जमिनीखाली केवळ 5 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू होता. भूगर्भातून आलेल्या एका भयानक आणि मोठ्या आवाजामुळे नागरिक प्रचंड घाबरले.

खिडक्यांच्या काचा अन् भांडी वाजली; सुदैवाने जीवितहानी टळली
मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना अचानक जमिनीतून प्रचंड गडगडाट झाला आणि घरे हलू लागली. या धक्क्यांमुळे अनेकांच्या घरातील खिडक्यांची तावदाने थरथरली, तर स्वयंपाकघरातील भांडी कपाटातून खाली पडली. भूकंप आल्याचे समजताच नागरिकांनी तात्काळ आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन घराबाहेर मोकळ्या जागेत धाव घेतली. भीतीपोटी अनेक गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र उघड्यावर जागून काढली. या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही मोठी जीवित अथवा वित्तहानी झाली नसली, तरी लोकांमध्ये अजूनही भीतीचे सावट आहे.

हिंगोली आणि वसमत तालुक्यातील अनेक गावे हादरली
या भूकंपाची तीव्रता परिसरातील अनेक गावांमध्ये जाणवली. यामध्ये प्रामुख्याने औंढा तालुक्यातील फुलदाभा, जलालदाभा, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, निशाणा, असोंदा, काकडदाभा, पांगरा, मेथा, जडगाव, राजापूर आणि जांब या गावांचा समावेश आहे. यासोबतच शेजारील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कुपटी, वापटी, कुरुंदा आणि गिरगाव या गावांनाही या भूकंपाचे तीव्र धक्के बसले.

हेही वाचा – Chembur Bus Accident Tragedy: त्याला खेळायला जायचंय…म्हणत ती माय विहानची बॅट छातीशी कवटाळून बसली, बघणाऱ्यांनाही अश्रू अनावर

प्रशासनाच्या भूमिकेवर गावकऱ्यांचा तीव्र संताप
वसमतमधील पांगरा शिंदे आणि कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा हा परिसर गेल्या काही काळापासून सातत्याने भूकंपाचे केंद्र ठरत आहे. येथे वारंवार जमिनीतून आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. मात्र, प्रशासन या भूकंपांचे नेमके शास्त्रीय कारण शोधण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भूकंप झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागाचे अधिकारी केवळ पाहणी करून मार्गदर्शक सूचना देतात; परंतु या मागचे मूळ कारण शोधण्यासाठी ठोस पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number