Hingane Dhanakawadi Tunnel: पुणे शहरातील वाहतूक कोंडीची मोठी समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) आणि सातारा रस्ता यांना थेट जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित हिंगणे-धनकवडी बोगदा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) पूर्ण झाला असून त्यावर आता अंतिम हात फिरवला जात आहे. हिंगणे ते धनकवडी दरम्यान तळजाई टेकडीचा अडथळा असल्यामुळे वाहनचालकांना सध्या थेट प्रवास करता येत नाही. परिणामी, नागरिकांना स्वारगेट किंवा कात्रजमार्गे सुमारे 7.5 ते 9 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. या त्रासामुळे प्रवाशांचे तब्बल 40 ते 50 मिनिटे वाया जातात, जी अडचण हा नवीन बोगदा दूर करेल.
प्रवासाच्या वेळेत मोठी बचत आणि बोगद्याची रचना
प्रस्तावित हिंगणे-तळजाई-धनकवडी बोगदा प्रकल्प प्रत्यक्ष साकार झाल्यानंतर केवळ 5 ते 10 मिनिटांच्या आत हा प्रवास पूर्ण करता येईल, असा दावा महापालिकेने केला आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 2.4 किलोमीटर लांबीचा रस्ता विकसित केला जाणार आहे. यामध्ये 930 मीटर लांबीच्या 4 लेन (2 अधिक 2) बोगद्याचा समावेश असून त्याच्या दोन्ही बाजूंना जोडणारे ॲप्रोच रस्ते तयार केले जातील. यामुळे प्रवासाचे अंतर कमी होऊन इंधनाची मोठी बचत होईल, तसेच स्वारगेट व कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.
रिंग रोड नेटवर्कमधील महत्त्वाचा टप्पा
हा नवा बोगदा पुण्याच्या इंटरमिजिएट रिंग रोड (IRR) नेटवर्कमधील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल. शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागांना जोडणारा हा एक उत्तम पर्यायी मार्ग ठरणार आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी आता भूसंपादन, पर्यावरणीय मंजुरी मिळवणे आणि आवश्यक आर्थिक तरतूद करणे यांसारख्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. या सर्व आघाड्यांवर तयारी झाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लवकरच निविदा प्रसिद्ध करून काम वेगाने सुरू केले जाईल.
वाकडेवाडी परिसरातील कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल
शहरातील दुसऱ्या एका मोठ्या प्रकल्पांतर्गत वाकडेवाडी परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी साखर संकुल येथून थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणारा उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाहनचालकांना गणेशखिंड रस्त्यावरून थेट साखर संकुलमार्गे पुणे-मुंबई रस्त्यावर जाता येईल. सध्या पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या चालकांना संचेती रुग्णालय आणि पाटील इस्टेट येथील तीव्र कोंडीचा सामना करावा लागतो. साखर संकुलजवळील सध्याच्या भुयारी मार्गातून केवळ दुचाकी आणि हलकी वाहनेच जाऊ शकत असल्याने ही मोठी कोंडी फोडण्यासाठी हा नवीन पर्याय शोधण्यात आला आहे.
स्थायी समितीची प्रशासकीय मान्यता
या वाकडेवाडी येथील नव्या उड्डाणपूल प्रकल्पासाठी सुमारे 73.52 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला स्थायी समितीने कलम '72 ब' अंतर्गत पुढील वर्षांच्या आर्थिक दायित्वासह गुरुवारी मंजुरी दिली आहे. स्थायी समितीच्या या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे (GB) ठेवला जाणार असून, त्यानंतर या कामाला गती मिळेल.
हेही वाचा – Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा आगीत होरपळून जागीच अंत