Raigad ST Driver Viral Video: मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. महामार्गावरून धावणाऱ्या एका एसटी बसच्या चालकाला काही अज्ञात इसमांनी भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्यामध्ये एसटी चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या माणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कार आडवी लावून बस थांबवली; मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस महामार्गावरून जात असताना एका कारमधील काही जणांनी एसटी बसचा पाठलाग केला. त्यानंतर चालकाने चालत्या बससमोर आपली कार अचानक आडवी लावून एसटी बस सक्तीने थांबवल्याचा आरोप आहे. बस थांबताच कारमधील लोक खाली उतरले आणि त्यांनी काहीही न ऐकता थेट एसटी चालकावर हल्ला चढवला. चालकाला बसमधून खाली ओढून भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमागील नेमके कारण काय होते, हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या संपूर्ण थरारक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये काही तरुण चालकाला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत, तर बसमधील प्रवासी आणि परिसरातील लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांमधून आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भररस्त्यात सरकारी कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.