Beed Crime: जिल्हा प्रशासनाचे केंद्र असलेल्या बीड नगरपालिकेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावत असलेले मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना त्यांच्याच कार्यालयात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पीटीआर (PTR) नोंदणीच्या वादातून एका व्यक्तीने केलेल्या या कृत्यामुळे पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुख्याधिकारी शैलेश फडसे हे आपल्या केबिनमध्ये कार्यालयीन कामात व्यस्त असताना एक इसम तिथे पोहोचला. पीटीआरवर नाव नोंदवण्यासाठी त्याने मुख्याधिकाऱ्यांवर नियमबाह्य दबाव टाकण्यास सुरुवात केली. फडसे यांनी नियमावली समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीने संतापाच्या भरात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिली. कार्यालयातील सतर्क कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
आपल्या सर्वोच्च अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “अधिकारी सुरक्षित नसतील, तर आम्ही काम कसे करायचे?” असा सवाल करत कर्मचाऱ्यांनी तातडीने काम बंद आंदोलन पुकारले आणि पालिकेसमोर ठिय्या दिला. संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.
हेही वाचा – Amravati Crime : घरातील व्यक्तीच ठरला नराधम! मामा कारागृहात असताना भाच्याकडून 40 वर्षीय मामीवर अत्याचार
पोलिसांची भूमिका आणि कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस अधीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी सांगितले की, मुख्याधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस संरक्षणाचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. मात्र, भरदिवसा शासकीय कार्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.