Maharashtra's Highway Update : संपूर्ण महाराष्ट्र सध्या मुसळधार पावसाच्या विळख्यात सापडला असून, यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबईतील स्थानिक रेल्वे सेवेला फटका बसण्यासोबतच राज्याला जोडणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि जुना हायवे पूर्णपणे बंद
सततचा पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या धास्तीमुळे 'पुणे-मुंबई एक्सप्रेसवे' (द्रुतगती मार्ग) तसेच 'जुना मुंबई-पुणे महामार्ग' या दोन्ही मार्गांवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. जुन्या महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने धोका वाढला आहे. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही आणि प्रशासनाकडून पुढील स्पष्ट सूचना मिळत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या दोन्ही शहरांदरम्यानचा आपला प्रवास तात्काळ रद्द करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ताम्हिणी घाट आणि आळंदी परिसरातील पूल पाण्याखाली
पुणे आणि रायगडला जोडणारा 'ताम्हिणी घाट मार्ग' रविवार, 5 जुलै रोजी रात्री 9 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. डोंगरवाडी प्लस व्हॅली पॉईंटजवळ ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे, इंद्रायणी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे आळंदी शहरात प्रवेश करणारे सर्व 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून हे पूल बंद करण्यात आले असून, वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सध्या आळंदीत येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
पुणे-नाशिक महामार्ग ठप्प आणि पर्यायी रस्तेही बंद
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात गेल्या अनेक तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुलाजवळ कचरा अडकल्याने ओढ्याचे पाणी थेट रस्त्यावर आले आहे. विशेष म्हणजे, या महामार्गाला पर्यायी असलेला 'मोई-फलकेवस्ती रस्ता' देखील जलमय झाल्याने वाहनचालकांचा अडसर अधिकच वाढला आहे. तसेच, इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तळवडे आणि चाकण MIDC ला जोडणारा 'मोई गावचा पूल' बंद करावा लागला आहे. परिणामी चिंबळी, कुरुळी आणि निघोजे या गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना 10 किलोमीटचा वळसा घालावा लागत आहे.
कल्याण-अहिल्यानगर मार्गावरील जुना रायता पूल बंद
कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील उल्हास नदीवरील 'जुना रायता पूल' सुरक्षेसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावरील वाहतूक थांबल्यामुळे परिसरातील 5 गावांना याचा थेट फटका बसला आहे. प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, काही वाहनचालक अजूनही बेजबाबदारपणे प्रवास करत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.