Maharashtra Rain Forecast: शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचा बहुतांश काळ कोरडा गेल्यानंतर, मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्याच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. यामुळे येत्या 3 दिवसांत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. 21 सप्टेंबर रोजी राज्यातील एकूण 22 जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्यासोबतच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची पुनरागमन
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर दक्षिण कोकणात पुन्हा वाढणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर आणि घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत पुढील 3 दिवस तीव्र वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा सर्वाधिक तडाखा
दरम्यान, येत्या 23 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत ताशी 40 ते 50 किमीच्या वेगाने वारे वाहून अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. बीड, परभणी आणि हिंगोली परिसरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, विदर्भातील नागपूर आणि अमरावतीसह बहुतांश जिल्ह्यांत सोमवारी वादळी पावसाची शक्यता आहे. मान्सूनने राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला असला तरी, या अचानक आलेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात पिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.