Nashik Rain Alert: सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक आणि सातारा जिल्ह्यात पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. हवामान खात्याने नाशिक जिल्ह्याला पुढील 4 ते 5 तासांसाठी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. विशेषतः घाटमाथ्यावर तब्बल 200 ते 500 मिलीमीटर इतका धुवाधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) च्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या असून, जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत केले आहे.
सप्तशृंगगड घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
दरम्यान, हवामान विभागाच्या वादळी पावसाच्या गंभीर इशाऱ्यानंतर नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवण प्रशासनाने तातडीने सुरक्षेची पावले उचलली आहेत. 31 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजेपासूनच प्रसिद्ध सप्तशृंगगड ते नांदुरी हा नागमोडी घाट रस्ता भाविक आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरक्षेचा उपाय म्हणून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज घेऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यास 1 ऑगस्ट रोजी हा मार्ग पुन्हा खुला करण्यात येईल. गड परिसरातील भक्तनिवागात थांबलेल्या भाविकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या आणि स्थानिक प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाईत कृष्णा नदीला महापूर
दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातही पावसाचे तांडव पाहायला मिळत आहे. धोम धरणातून सातत्याने सुरू असलेल्या विसर्गामुळे आणि पश्चिम भागातील संततधार पावसामुळे कृष्णा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. वाई शहरातील सर्व ऐतिहासिक घाट पाण्याखाली गेले असून, प्रसिद्ध 'दक्षिणकाशी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईतील महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. थेट बाप्पाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
जांभळी धरण ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
याशिवाय, वाई तालुक्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे जांभळी धरण 100 टक्के भरले असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाई शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या पुलांवरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.