Road Accident: रस्ते अपघातीची अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात शुक्रवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा रस्ते अपघात घडला. पुरुषोत्तमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडकापल्ली चौकाजवळ एका भरधाव बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिल्यानंतरही बस थांबली नाही आणि तिने रिक्षाला सुमारे 100 मीटरपर्यंत फरफटत नेले. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच हाहाकार उडाला आहे. अपघातानंतर रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून आरोपी बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मंदिराच्या दर्शनासाठी जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 10 सदस्य रिक्षामध्ये
प्राथमिक माहितीनुसार, या रिक्षात एकाच कुटुंबातील 10 सदस्य प्रवास करत होते. हे सर्व जण 'माँ सिंहसिनी मंदिरा'च्या दर्शनासाठी जात असताना लाडकापल्ली चौकाजवळ हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस अत्यंत भरधाव वेगाने धावत होती आणि अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने तिने रिक्षाला थेट उडवले. मृतांची अधिकृत ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे.
स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य; जखमींची प्रकृती चिंताजनक
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक रहिवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रिक्षामध्ये गंभीररीत्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका पथकेही घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सुरुवातीला तात्काळ कोडला येथील रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना ब्रह्मपूर येथील एम.के.सी.जी. (MKCG) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती अद्यापही अत्यंत चिंताजनक आहे.
हेही वाचा – LPG Cylinder Delivery : गुड न्यूज! एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलबाबत केंद्राकडून मोठी अपडेट; 3 दिवसांत…
अतिवेग ठरला अपघाताचे कारण; फरार बसचालकाचा शोध सुरू
पोलिसांनी या दुर्दैवी प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून अपघाताचा सखोल तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासातून अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे हेच या भीषण अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. फरार झालेल्या आरोपी बसचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, परिसरातील CCTV कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.