Solapur Crime: शेअर मार्केटमधील अवाढव्य आर्थिक नुकसानीमुळे एका संपूर्ण सुशिक्षित कुटुंबाचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना सोलापूरच्या बार्शी तालुक्यात उघडकीस आली आहे. वैराग जवळील हत्तीज येथे एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या पत्नीसह दोन निष्पाप मुलांचा जीव घेऊन स्वतःचेही आयुष्य संपवले. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे.
1कोटी 80 लाखांचे कर्ज आणि विवंचना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बाळासाहेब पाटील (वय 41) असे मृताचे नाव असून ते नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवेत होते. योगेश पाटील यांनी शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती. मात्र त्यात त्यांना सातत्याने अपयश आले. या नादात त्यांच्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे प्रचंड कर्ज झाले होते. नातेवाईक आणि परिचितांकडून घेतलेले उसने पैसे परत कसे करायचे, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
22 पानांची नोट
मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी मृत्यूला कवटाळण्यापूर्वी 22 पानांची एक सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी शेअर मार्केटमधील नफा-तोटा, कर्जबाजारीपणा आणि नातेवाईकांचे पैसे वेळेत न फेडू शकल्याची खंत व मानसिक वेदना सविस्तरपणे मांडल्या आहेत. वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी या चिठ्ठीच्या संदर्भातील अधिकृत माहिती दिली.
आधी कुटुंबाला विष दिले, नंतर स्वतः गळफास घेतला
दरम्यान, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या योगेश पाटील यांनी सुरुवातीला पत्नी माधुरी पाटील, मुलगा अथर्व आणि दुसरा मुलगा शिवांश यांना विष पाजले. तिघांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी स्वतःही विष प्राशन केले आणि घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. एकाच घरातील चार जणांचे मृतदेह आढळल्याने बार्शी तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वैराग पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.