Stock Market Crash: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,836.57 अंशांनी (2.46 टक्के) कोसळून 72,696.39 वर बंद झाला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 14 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
निफ्टीमध्येही मोठी घसरण; गुंतवणूकदार धास्तावले
सेन्सेक्ससोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली. निफ्टी 601.85 अंशांनी (2.60 टक्के) घसरून 22,512.65 वर स्थिरावला. बाजार उघडल्यापासूनच विक्रीचा दबाव असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. जागतिक घडामोडी आणि मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफावसुली केल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
बड्या कंपन्यांच्या शेअर्सना फटका
निफ्टी 50 मधील 50 पैकी तब्बल 47 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले, तर केवळ 3 कंपन्यांना आपली वाढ टिकवता आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हात बंद झाले. टाटा समूहाच्या 'Titan' ला या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला असून, हा शेअर 6.24 टक्क्यांनी कोसळला. त्यापाठोपाठ Trent (5.90 टक्के), UltraTech Cement (5.40 टक्के) आणि Tata Steel (4.80 टक्के) यांसारख्या बड्या कंपन्यांचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात घसरले.
बँकिंग आणि आयटी क्षेत्राची स्थिती
बँकिंग क्षेत्रातही मोठी पडझड पाहायला मिळाली. HDFC Bank (4.70 टक्के), Kotak Mahindra Bank (2.89 टक्के) आणि SBI (2.52 टक्के) चे शेअर्स घसरले. आयटी क्षेत्रात संमिश्र वातावरण होते; HCL Tech चा शेअर 1.83 टक्क्यांनी वधारला, तर Infosys (0.28 टक्के) आणि Tech Mahindra (0.19 टक्के) मध्ये किरकोळ वाढ दिसून आली. मात्र, TCS (0.32 टक्के) आणि Reliance Industries (0.52 टक्के) सारख्या दिग्गजांनाही घसरणीचा सामना करावा लागला.
हेही वाचा – SBI YONO अॅप ब्लॉक होणार? आधार अपडेटच्या नावाखाली मोठी फसवणूक; ग्राहकांना धोक्याचा इशारा
गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान
आजच्या एकाच दिवसाच्या व्यवहारामुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Cap) मोठी घट झाली आहे. जवळपास 14 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एका दिवसात पुसली गेल्याने लहान गुंतवणूकदारांपासून मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. आगामी काही दिवस बाजारात अशीच अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.