Raghav Chadha: आम आदमी पार्टी (AAP) आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मतभेदांच्या चर्चांदरम्यान राघव चढ्ढा यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर करत पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्यावर स्क्रिप्टेड आणि सुनियोजित हल्ला केला जात आहे,” असे म्हणत त्यांनी आपली बाजू परखडपणे मांडली आहे.
‘सुनियोजित हल्ला आणि खोट्याचा प्रसार’
राघव चढ्ढा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्याविरोधात एक ठराविक साचा वापरून मोहीम चालवली जात आहे. “सुरुवातीला मला वाटले मी गप्प राहावे, पण जर एखादे खोटे शंभर वेळा सांगितले गेले, तर लोकांना ते सत्य वाटू लागते. म्हणूनच मला आज बोलावे लागत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. संसदेत बोलण्यावर बंदी घालण्यासाठी पक्षाने त्यांच्यावर तीन विशिष्ट आरोप केले असून ते पूर्णपणे निराधार असल्याचे चढ्ढा यांनी सांगितले.
सभात्याग आणि महाभियोग प्रस्तावावर स्पष्टीकरण
पक्षाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना चढ्ढा यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले:
वॉकआउटचा आरोप: विरोधकांच्या सभात्यागात मी सहभागी होत नाही, हा दावा त्यांनी फेटाळला. “संसदेतील CCTV फुटेज तपासा, मी नेहमीच एकजुटीने उभा राहिलो आहे,” असे आव्हान त्यांनी दिले.
निवडणूक आयुक्तांविरुद्धचा प्रस्ताव: मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याच्या आरोपावर ते म्हणाले, “पक्षाच्या कोणत्याही नेत्याने मला यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले नव्हते. शिवाय, ‘आप’च्या 10 पैकी 7 खासदारांनी यावर स्वाक्षरी केलेली नाही, मग केवळ मलाच लक्ष्य का केले जात आहे?”
‘मी संसदेत गोंधळ घालायला नाही, तर प्रश्न मांडायला गेलो होतो’
राघव चढ्ढा यांनी तिसऱ्या आरोपाचे खंडन करताना सांगितले की, ते संसदेत केवळ किरकोळ प्रश्न मांडतात हा आरोप चुकीचा आहे. “मी संसदेत माईक तोडण्यासाठी किंवा आरडाओरडा करण्यासाठी गेलो नव्हतो. मी जीएसटी, आयकर, पंजाबची पाणीटंचाई, दिल्लीचे प्रदूषण आणि रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर आवाज उठवला आहे. गेल्या 4 वर्षांतील माझी संसदीय कामगिरी पाहिली, तर मी करदात्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याचे दिसून येईल,” असे ते म्हणाले.
मैं बोलना नहीं चाहता था, मगर चुप रहता तो बार-बार दोहराया गया झूठ भी सच लगने लगता। Three Allegations. Zero Truth. My Response: pic.twitter.com/tPdjp04TLt — Raghav Chadha (@raghav_chadha) April 4, 2026
‘मी घायाळ आहे, पण दुर्दम्य आहे’
आपल्या निवेदनाच्या शेवटी राघव चढ्ढा यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. “प्रत्येक खोटेपणा उघड होईल आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. मी सध्या घायाळ आहे, आणि म्हणूनच मी अधिकच दुर्दम्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला लढा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. या वादामुळे ‘आम आदमी पार्टी’मधील अंतर्गत गटबाजी आता राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.