Pune Metro News : पुणेकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पुणे शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत. मात्र खासगी वाहनांची झपाट्याने वाढ होत असताना सार्वजनिक वाहतुकीची क्षमता अपुरी ठरत असल्याने मेट्रोचे जाळे वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता तिसरा मेट्रो मार्ग लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो लाईन-3 पुढील वर्षी प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता असून, सुमारे 23.3 किलोमीटर लांबीचा हा मार्ग मार्च 2026 पर्यंत पूर्ण होऊ शकतो. या मार्गामुळे आयटी क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, सध्याच्या मेट्रो मार्गांवरील प्रवासीसंख्येतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
या मार्गिकेमुळे हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क थेट शहराच्या मध्यभागाशी जोडला जाणार आहे. तसेच ही लाईन सध्याच्या मेट्रो लाईन 1 आणि लाईन 2 शी सिव्हिल कोर्ट स्थानकाजवळ स्कायवॉकद्वारे जोडली जाणार असल्याने प्रवाशांना बदल सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम वेळापत्रकानुसार पूर्ण करून 31 मार्चपर्यंत सेवा सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि खराडी ते खडकवासला या दोन नवीन मार्गांच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. पिंपरी-चिंचवड–निगडी मार्गाचे काम वेगात सुरू असून सप्टेंबर 2026 पर्यंत ते पूर्ण होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, स्वारगेट ते कात्रज हा भूमिगत मार्ग काही तांत्रिक अडचणींमुळे सध्या रखडलेला आहे. रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या मार्गांचे कामही लवकरच सुरू होणार आहे.
हेही वाचा – Nilesh Rane: कोकणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाची लॉटरी; निलेश राणेंचं शिवसेनेत 'प्रमोशन' निश्चित?
भविष्यातील मेट्रो जाळे अधिक व्यापक
पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्यातील विस्तारासाठी तयारी सुरू असून रामवाडी-वाघोली आणि वानवडी-चांदणी चौक या मार्गांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याशिवाय वडगाव ते कात्रज (मुंबई–बंगळूर बायपास मार्गे), वडगाव ते चाकण, खराडी ते पुणे विमानतळ, शिवाजीनगर ते कोंढवा, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड रेल्वे या प्रस्तावित मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा विचार सुरू आहे. या सर्व विस्तारांमुळे पुण्याच्या विविध भागांमध्ये थेट संपर्क निर्माण होणार असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय मिळेल. त्याचबरोबर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासही मेट्रो मोठी मदत करेल.