MSP Kharif Crops: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. 2026-27 च्या खरीप हंगामासाठी एकूण 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला आणि पिकांना किफायतशीर भाव मिळावा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने शेती क्षेत्राला प्राधान्य देत खरीपातील 14 प्रमुख पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे." या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्या पिकांच्या दरात सर्वाधिक वाढ?
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या एमएसपीमध्ये झालेली वाढ खालीलप्रमाणे आहे:
सूर्यफूल: सर्वाधिक 622 रुपये प्रति क्विंटलची वाढ.
कापूस: 557 रुपये प्रति क्विंटलने दर वधारले.
तीळ: 500 रुपये प्रति क्विंटलने भाव वाढले.
शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यावर भर
सरकारच्या अंदाजानुसार, या नवीन दरवाढीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजरी आणि तूर या पिकांमधून सर्वाधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 2026-27 च्या हंगामासाठी जाहीर करण्यात आलेली ही नवी किंमत प्रणाली शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.