Farmer Loan Waiver : फडणवीस सरकारने राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात
पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर मैदानावर आयोजित पुणे कृषी हॅकाथॉन 2026 च्या पारितोषिक वितरण समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून, प्रशासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. 'काही विशिष्ट जिल्ह्यांकडून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. हा डेटा प्राप्त होताच अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल,' असंही ते म्हणाले.
'शेतकरी सुखी, तर राज्य सुखी' – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
या कार्यक्रमाप्रसंगी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीदेखील सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हटलं की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, लवकरच कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर होईल. सरकारने शेतकऱ्यांना वीज बिलात मोठी सवलत दिली आहे. सध्या खतांच्या पुरवठ्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणीही लवकरच मार्गी लावल्या जातील. तथापी, त्यांनी सांगितलं की, कृषी क्षेत्रात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून याचा फायदा आधुनिक शेतीसाठी होणार आहे.
नेत्यांच्या आठवणींना उजाळा
दरम्यान, कृषिमंत्री भरणे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या पद्धतीचा गौरव केला. "शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणारा नेता म्हणून अजित दादांची ओळख आहे. त्यांच्याच प्रेरणेने प्रशासन शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे," असेही त्यांनी नमूद केले.