Shetkari Karj Mafi: महाराष्ट्रातील बळीराजाला दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी तब्बल 36,585 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याद्वारे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा थेट फायदा मिळणार आहे. याशिवाय, पूर्वीच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील 12 लाख लाभार्थ्यांना देखील 2 लाखापर्यंतचे कर्जमाफीचे कवच देण्यात येणार आहे. या संपूर्ण उपक्रमाचा एकूण आर्थिक भार 40,980 कोटी इतका असून, सुरुवातीचा टप्पा म्हणून 6 विविध जिल्हा बँकांमधील 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या 553 लाभार्थ्यांचे एकूण 2 कोटी 99 लाख 37540 रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. यात प्रामुख्याने अमरावती जिल्हा बँकेतील 58, लातूरमधील 133, नागपूरमधील 16, पुण्यातील 85, सातारामधील 38 आणि ठाणे जिल्हा बँकेच्या 182 शेतकऱ्यांचा समावेश आहे. संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि टप्प्याटप्प्याने राबवली जात असून, कर्जमाफी मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांना नव्या पीककर्जापासून वंचित ठेवता येणार नाही, असा स्पष्ट नियम सरकारने केला आहे. तसेच, वेळेवर आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या 23.63 लाख शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असून, एकूण 32 लाख शेतकऱ्यांना यातून थेट फायदा पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
दुसरीकडे, शेतीव्यतिरिक्त इतर मार्गाने उत्पन्न मिळवून इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. प्राप्तिकर विभागाकडून आवश्यक माहिती उपलब्ध होताच उर्वरित पात्र याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळील 'आपले सरकार' केंद्रावर जाऊन खात्यातील कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि आपले आधार त्वरित पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.