Gold Investment Tips : भारतीय संस्कृतीत सोने खरेदीला केवळ परंपराच नव्हे, तर गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग मानले जाते. मात्र, बदलत्या काळानुसार सोने खरेदीचे स्वरूपही बदलले आहे. सध्या बाजारात प्रत्यक्ष सोने (दागिने), डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ (Gold ETF) असे तीन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदारांना अनेकदा यापैकी कोणता पर्याय निवडावा असा प्रश्न पडतो. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे फायदे आणि मर्यादा आहेत, ज्यांचा नीट अभ्यास केल्यास भविष्यात अधिक चांगला परतावा मिळवता येतो.
दागिने खरेदीतील तोटा आणि तांत्रिक अडचणी
बहुतेक भारतीय कुटुंबांमध्ये दागिने खरेदीला प्राधान्य दिले जाते, परंतु गुंतवणुकीच्या दृष्टीने हा सर्वात कमी फायदेशीर पर्याय ठरतो. जाणून घेऊ, याची कारणे काय आहेत –
– घडणावळ शुल्क (दागिन्यांची मजुरी) : दागिन्यांवर 8 टक्के ते 25 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्जेस (घडणावळ शुल्क) आकारले जातात.
– कराचा बोजा: खरेदी करताना 3 टक्के GST भरावा लागतो, जो विक्रीच्या वेळी परत मिळत नाही.
– शुद्धतेची चिंता: प्रत्यक्ष सोन्याच्या बाबतीत शुद्धतेबद्दल नेहमीच शंका राहू शकते.
– विक्रीच्या वेळी नुकसान: दागिने विकताना केवळ सोन्याच्या वजनाचे पैसे मिळतात, खर्च केलेले टॅक्स आणि मेकिंग चार्जेस बुडतात.
गोल्ड ईटीएफ (Gold ETF): सुरक्षितता आणि नियमन
दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. हे शेअर बाजारात शेअर्सप्रमाणे विकले जातात आणि त्यांचे नियंत्रण थेट 'सेबी' (SEBI) द्वारे केले जाते.
– कमी कर: अर्थसंकल्पानंतरच्या नियमांनुसार, 12 Months नंतर गोल्ड ईटीएफ विकल्यास LTCG वर केवळ 12.5 % कर लागतो.
– पारदर्शकता: यामध्ये सोन्याच्या शुद्धतेची किंवा चोरीची कोणतीही भीती नसते.
– डिमॅट खाते: यासाठी गुंतवणूकदाराकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.
– थेट सोन्यासाठी कराची ही कालमर्यादा 24 महिने आहे, त्यामुळे ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे करबचतीच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरते.
डिजिटल गोल्ड: नवोदित गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी पण जोखीम सुद्धा
ज्यांना मोठ्या रकमेऐवजी लहान रकमेतून सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड हा एक सोयीस्कर पर्याय आहे.
– कमी गुंतवणूक: Amazon किंवा Paytm सारख्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही अगदी 100 किंवा 500 रुपयांपासून सोने खरेदी करू शकता.
– साठवणुकीची गरज नाही: हे सोने डिजिटल स्वरूपात असल्याने ते सांभाळण्याची किंवा लॉकरची गरज नसते.
– नियमनाचा अभाव: सर्वात मोठी अडचण ही आहे की, डिजिटल गोल्डचे नियंत्रण RBI किंवा SEBI सारख्या कोणत्याही केंद्रीय संस्थेकडे नाही, त्यामुळे यात जोखीम जास्त असू शकते.
योग्य गुंतवणुकीचा मंत्र
सोन्यामध्ये गुंतवणूक करताना आपला हेतू स्पष्ट असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला लग्नासाठी किंवा वापरासाठी सोने हवे असेल, तर दागिने हाच पर्याय योग्य ठरतो. मात्र, जर तुमचे उद्दिष्ट केवळ संपत्ती वाढवणे आणि भविष्यातील गरजा पूर्ण करणे असेल, तर गोल्ड ईटीएफ हा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग आहे. लहान मुलांच्या भविष्यासाठी किंवा आपत्कालीन निधीसाठी डिजिटल गोल्डच्या माध्यमातून अल्प प्रमाणात गुंतवणूक सुरू करणे हा एक शहाणपणाचा निर्णय ठरू शकतो. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुम्हाला दीर्घकाळात आर्थिक स्थैर्य मिळवून देईल.
हेही वाचा – वारंवार UPI व्यवहार केल्याने CIBIL Score खराब होतो का? जाणून घ्या डिजिटल पेमेंटमागील 'हे' तांत्रिक सत्य!