New Rules for Gig Workers: स्विगी, झोमॅटो, ओला आणि उबर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या लाखो 'गिग वर्कर्स'साठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. कामगार मंत्रालयाने गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांच्या भविष्यासाठी सामाजिक सुरक्षा नियमांचा मसुदा (Draft) प्रसिद्ध केला असून, याद्वारे या असंघटित क्षेत्रातील कामगारांना आरोग्य आणि विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
काय आहे सरकारच्या नवीन नियमांचा मसुदा?
प्रस्तावित नियमांनुसार, गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील:
90 दिवसांचा नियम: एका आर्थिक वर्षात किमान 90 दिवस एकाच कंपनीसोबत काम करणाऱ्या कामगाराला सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील.
एकाधिक प्लॅटफॉर्म (Multiple Apps): जर एखादा कामगार एकापेक्षा जास्त ॲप्सवर काम करत असेल, तर त्याच्यासाठी ही मर्यादा 120 दिवसांची असेल.
मिळणारे फायदे: यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विमा, जीवन विमा आणि अपघात विमा (Accident Cover) यांचा समावेश असेल.
पात्रता आणि नोंदणी प्रक्रिया
गिग वर्कर म्हणून ओळख मिळवण्यासाठी आणि लाभांचा आनंद घेण्यासाठी काही तांत्रिक बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे: यात आधार-लिंक्ड नोंदणी, 16 वर्षांवरील सर्व कामगारांना 'ई-श्रम' पोर्टलवर आधार कार्डद्वारे नोंदणी करणे अनिवार्य असेल. नोंदणीनंतर प्रत्येक पात्र कामगाराला एक 'युनिव्हर्सल अकाउंट नंबर' (UAN) आणि डिजिटल ओळखपत्र दिले जाईल. या कामगारांना थेट 'आयुष्मान भारत' योजनेशी जोडले जाणार आहे. तसेच भविष्यात कंपनी आणि कामगार यांच्या योगदानातून पेन्शन योजना सुरू करण्याचाही विचार आहे.
हेही वाचा – Bharat Taxi: खासगी वाहनांनी मनमानी संपणार; देशभरात 'भारत टॅक्सी' सेवा सुरू, किती भाडे आकारणार? जाणून घ्या
दरम्यान, गिग कामगारांच्या कल्याणासाठी सरकार एक विशेष मंडळ स्थापन करणार आहे. या मंडळात सरकारकडून नियुक्त केलेले नियोक्ता संघटनांचे 5 आणि असंघटित कामगारांचे 5 प्रतिनिधी असतील. हे मंडळ नवीन प्लॅटफॉर्मची ओळख पटवणे आणि कल्याणकारी धोरणे राबवण्याचे काम करेल.
लाभ कधी बंद होणार?
मसुद्यानुसार, कामगाराचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा संबंधित आर्थिक वर्षात विहित दिवसांचा (90/120 दिवस) कामाचा कोटा पूर्ण न झाल्यास हे सामाजिक सुरक्षा लाभ मिळणे बंद होईल.