Gauri Garje Death: मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवलं. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असताना, आज गौरी यांची आई अलकनंदा पालवे यांनी पत्रकार परिषद घेत अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबावर थेट आरोपांची सरबत्ती केली.
पत्रकार परिषदेत अलकनंदा पालवे यांनी सांगितले की, संध्याकाळी सातच्या सुमारास फोनवरून गौरीने आयुष्य संपवल्याची माहिती देण्यात आली. मात्र, ही घटना आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनंत गर्जे, शितल गर्जे आणि अजय गर्जे या तिघांनी मिळून गौरीला संपवलं आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला.
मृतदेहावरील जखमा संशय निर्माण करणाऱ्या: कुटुंबीयांचा दावा
गौरीचा मृतदेह पाहताना तिच्या छातीवर व डोक्यावर मारहाणीच्या खुणा दिसल्याचा दावा अलकनंदा पालवे यांनी केला. त्यांनी म्हटले की, आत्महत्या केल्यास गळ्यावर खुणा असतात, मात्र छाती आणि डोक्यावरील जखमा कुठून आल्या? तथापी, अनंतचा एकच मोबाइल जप्त करण्यात आला. दुसरा मोबाईल का घेतला नाही? या दोन मुद्द्यांवर त्यांनी एसआयटीमार्फत स्वतंत्र तपास करण्याची मागणी केली. सध्याच्या तपासावर आमचा विश्वास नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – Gauri palwe death case : गौरी पालवे मृत्यूप्रकरणी पती अनंत गर्जेला अटक; पोलिसांच्या तपासाला वेग
अनंत तिला मारहाण करायचा
अलकनंदा पालवे यांनी आरोप केला की, गौरीने पूर्वी अनंतच्या मारहाणीबाबत तक्रारी केल्या होत्या. गौरी अत्यंत गुणी आणि शिक्षित होती. पण तिच्याला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येत होता. आम्ही रुग्णालयात पोहोचल्यावर गौरी थेट पोस्टमार्टम रूममध्ये होती. पंचनामा न करता तिचे पोस्टमार्टम का करण्यात आले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.