Gaurav Khanna On Bigg Boss 19 Winning Prize : विजेतेपद मिळवून 3 महिने उलटले, तरी 'बिग बॉस 19' चा विजेता गौरव खन्ना अजूनही त्याच्या बक्षिसाच्या प्रतीक्षेत आहे. डिसेंबर 2025 मध्ये दिमाखदार सोहळ्यात सलमान खानने गौरवला विजेता घोषित केले होते, मात्र अद्याप त्याला 50 लाख रुपये आणि नवीन कोरी कार मिळालेली नाही. खुद्द गौरवनेच त्याच्या युट्यूब व्लॉगद्वारे ही माहिती दिली असून, यामागचे नेमके कारणही स्पष्ट केले आहे.
अद्याप बक्षीस का मिळाले नाही?
आपल्या नवीन व्लॉगमध्ये गौरवने चाहत्यांशी संवाद साधला. एका चाहत्याने त्याला बक्षिसांच्या रकमेबद्दल विचारले असता तो म्हणाला की, रिअॅलिटी शोमधील बक्षिसे हातात पडायला थोडा वेळ लागतो. "प्रत्येक कंपनीची एक विशिष्ट प्रक्रिया आणि अंतर्गत ऑडिट (Internal Audits) असतात. टीव्ही क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला या प्रक्रियेची कल्पना आहे. साधारण 1 ते 2 महिने लागणे स्वाभाविक आहे, त्यामुळे मला त्याची फारशी काळजी नाही. हे बक्षीस नक्कीच मिळेल याची मला खात्री आहे," असे त्याने स्पष्ट केले.
हेही वाचा – Esha Dey : नवरी नटली लाल साडीत! हास्यजत्रा' फेम ईशा डेचा नववधूचा साज व्हायरल; लग्नाचे फोटो पाहून चाहते खुश
वादमुक्त राहून जिंकला शो
गौरव खन्नाने 'बिग बॉस 19' च्या अंतिम फेरीत फरहाना भट्ट, तान्या मित्तल, प्रणीत मोरे आणि अमाल मलिक या स्पर्धकांवर मात करत विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे, बिग बॉसच्या इतिहासात विनाकारण भांडणे न करता किंवा वादात न अडकता शो जिंकणारा गौरव अशा प्रकारच्या मोजक्या स्पर्धकांपैकी ठरला आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' नंतर हा त्याचा सलग दुसरा रिअॅलिटी शो विजय आहे. डिसेंबर 2025 मध्ये झालेला हा ग्रँड फिनाले चाहत्यांच्या आजही लक्षात आहे. गौरवच्या म्हणण्यानुसार, त्याने यापूर्वी अनेक मालिका केल्या असल्या तरी, 'बिग बॉस'मुळे त्याला मिळालेली लोकप्रियता अभूतपूर्व आहे. लोकांनी त्याच्या खेळाच्या शैलीला आणि संयमाला पसंती दिली, ज्यामुळे घराघरात त्याचे नाव पोहोचले आहे. शो जिंकल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? या प्रश्नाचे उत्तर देताना गौरव म्हणाला की, आता रोज सुमारे 50 ते 60 लोक त्याला भेटण्यासाठी त्याच्या कानपूरमधील घरी येतात.
भविष्यातील वाटचालीवर लक्ष
बक्षिसाची रक्कम न मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार न करता गौरव सध्या त्याच्या कामात व्यग्र आहे. गौरवच्या मते, बक्षिसापेक्षा प्रेक्षकांचे प्रेम अधिक महत्त्वाचे आहे. सध्या तो त्याच्या नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत असून, लवकरच तो एका मोठ्या मालिकेत दिसण्याची शक्यता आहे. तोपर्यंत चाहत्यांच्या पत्रांना आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तो सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहे.
हेही वाचा – Onkar Bhojane: कोकण कोहिनूर ओंकार भोजने पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘सालबर्डी’मध्ये साकारणार दमदार भूमिका