रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील माभळे या ठिकाणी गणपती विसर्जनावेळी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. बावनदी पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या वडील आणि मुलाचा पाण्यात बुडून अपघात झाला. या दुर्घटनेत पुरुषोत्तम घडशी यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, त्यांचा मुलगा प्रज्वल घडशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेमुळे ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात शोककळा पसरली असून घडशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आनंदाच्या उत्सवाला गालबोट
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. पुरुषोत्तम घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल हे दोघही गणपती विसर्जनासाठी बावनदी पात्रात गेले होते. विसर्जन करत असताना नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह आणि पाण्याची खोली यांचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक पाण्यात बुडाले. त्यानंतर दोघेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले.
प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरु केले. परिसरातील नागरिक आणि काही तरुणांनी लगेच नदीपात्राकडे धाव घेतली. श्रीकांत घडशी यांनी धाडसाने नदीपात्रात जाऊन पुरुषोत्तम घडशी यांना पाण्यातून बाहेर काढले, त्यामुळे पुरुषोत्तम यांचे प्राण वाचवण्यात यश आले. दरम्यान, प्रज्वल घडशी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने स्थानिक तरुणांकडून त्याचा शोध सुरु केला. काही वेळी शोधमोहीम राबवत प्रज्वलला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, त्याला वाचवण्यात यश आले नाही. या दुर्घचनेत प्रज्वलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.