Middle Eact Tension : मध्य पूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले असून इराणच्या अडचणींत मोठी भर पडली आहे. इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायल सुरू असलेल्या या संघर्षाच्या 23 व्या दिवशी जगातील सात शक्तिशाली देशांनी (G7) एकत्र येत इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणने पुकारलेल्या या युद्धामुळे केवळ आखाती देशच नाही, तर संपूर्ण जगाची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे.
होर्मूझची सामुद्रधुनी बंद आणि ऊर्जेचे संकट
इराणने आपल्या शत्रू राष्ट्रांची कोंडी करण्यासाठी 'होर्मूझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पूर्णपणे बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जगातील इंधन पुरवठ्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा मार्ग बंद झाल्यामुळे अनेक देशांमध्ये भीषण ऊर्जा संकट निर्माण झाले असून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर आक्रमक पवित्रा घेत इराणला केवळ 48 तासांचा अवधी दिला आहे. जर या दोन दिवसांत हा सागरी मार्ग पुन्हा सुरू झाला नाही, तर अमेरिका इराणवर थेट आणि भीषण लष्करी हल्ला करेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यासह आता इराणच्या दादागिरीमुळे चिडलेल्या G7 देशांनीही इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
G7 देशांची एकजूट आणि इराणला इशारा
इराणने केवळ अमेरिका आणि इस्रायलवरच नव्हे, तर ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे सैन्य तळ आहेत, त्या देशांवरही हल्ले केले आहेत. या कृत्याचा निषेध करण्यासाठी आता G7 गट (कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका) मैदानात उतरला आहे. या सात देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. इराणने हे युद्ध तत्काळ थांबवावे. आखाती देशांवर हल्ले करणे थांबवावे. अन्यथा, जागतिक स्तरावर इराणची मोठी नाकेबंदी केली जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
इराणच्या हल्ल्यांमध्ये आखाती देशांचे नुकसान
इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये बहरीन, कुवेत, कतार आणि सौदी अरेबिया यांसारख्या आखाती देशांमधील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. G7 देशांनी या पीडित आखाती राष्ट्रांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. या देशांमधील नागरी वस्त्या आणि औद्योगिक क्षेत्रांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील स्थैर्य धोक्यात आले असून, इराणची ही कृती आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे मत या शक्तिशाली देशांनी व्यक्त केले आहे.
जागतिक चिंतेत भर
युद्ध आता 25 व्या दिवसाच्या जवळ पोहोचले असताना, G7 देशांच्या एन्ट्रीने युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य आणि दुसरीकडे सात बलाढ्य देशांचा राजकीय दबाव यामुळे इराण आता एकाकी पडला आहे. जर इराणने ट्रम्प यांनी दिलेल्या 48 तासांच्या मुदतीत माघार घेतली नाही, तर जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे राहावे लागेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आता इराणच्या पुढच्या पाऊलाकडे लागले आहे.
हेही वाचा – Iran Israel Conflict: धक्कादायक! ट्रम्प यांचा अल्टिमेटम फेल? इराणची खेळी पाहून अमेरिकेची चिंता वाढली