Pune Pay and Park : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगला लगाम घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने अखेर कंबर कसली आहे. तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुण्यातील सहा महत्त्वाच्या रस्त्यांवर 'पे अँड पार्क' धोरण लागू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दुचाकींसाठी केवळ 4 रुपये प्रतितास या दराने वाहनतळ सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, यामुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला 12 कोटी रुपयांची भर पडणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या नवीन 'पे अँड पार्क' धोरणांतर्गत उपलब्ध असणाऱ्या क्षमतेचा विचार करता, शहरातील निवडक सहा रस्त्यांवर एकूण 6344 दुचाकी लावण्याची सोय करण्यात आली असून, त्यासाठी प्रतितास 4 रुपये इतका माफक दर निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, याच मार्गांवर 618 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची क्षमता उपलब्ध असून, या मोठ्या वाहनांसाठीच्या शुल्काची निश्चिती करण्याची प्रक्रिया सध्या प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.
'या' 6 रस्त्यांवर लागणार पार्किंग शुल्क
महापालिकेने पहिल्या टप्प्यात शहरातील सर्वात गजबजलेल्या सहा मार्गांची निवड केली आहे. यात लक्ष्मी रोड, जंगली महाराज (JM) रस्ता, फर्ग्युसन कॉलेज (FC) रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट, विमाननगर रस्ता, बिबवेवाडी मुख्य रस्त्याचा समावेश आहे.
निर्णयामागचे मुख्य कारण काय?
दरम्यान, शहरातील रस्त्यांवर विशेषतः लक्ष्मी रस्त्यावर व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी सकाळीच वाहने पार्क करतात, ज्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना जागा मिळत नाही. तसेच, अनेक रस्त्यांवर बेवारस वाहने तासन् तास पडून असतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि पार्किंगचे नियोजन शिस्तबद्ध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही या धोरणाचा आग्रह धरला होता.
निविदा प्रक्रिया आणि अडथळे
जरी महापालिकेने हे धोरण राबवण्याचे निश्चित केले असले, तरी सध्या 'अडथळ्यांची शर्यत' सुरू आहे. 'पे अँड पार्क' चालवण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर सुमारे 2 ते 3 लाख बेवारस वाहने पडून असण्याची शक्यता आहे. ठराविक लोकांच्या मक्तेदारीमुळे सर्वसामान्यांना पार्किंग मिळत नाही, हे चित्र बदलण्यासाठी पार्किंग धोरण आवश्यक आहे, असे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.