Khadakwasla Dam Water: पुणे शहर आणि घाटमाथ्यावरील डोंगराळ भागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणेकरांची तहान भागवणारे खडकवासला धरण 6 जुलै रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 32 टक्के भरले असून, पाण्याचा येणारा वेग पाहता पुढील 24 तासांत ते 80 टक्के पेक्षा जास्त भरण्याचा अंदाज आहे. पावसाचा हाच जोर कायम राहिल्यास धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात कधीही पाणी सोडले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या रहिवाशांना आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, नदीपात्रात न उतरण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
इंद्रायणी नदीला पूर; उजनी धरणाच्या जलपातळीत झपाट्याने वाढ
पश्चिम घाटातील अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, हे पूरपाणी आता भीमा नदीला मिळत आहे. सध्या दौंड बंधाऱ्यातून 27,847 क्येसेस वेगाने भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रचंड प्रवाहामुळे सोलापूर आणि पुण्याची भाग्यरेषा असलेल्या उजनी धरणाचा जलसाठा वेगाने वाढू लागला आहे. संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी 24 तास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
खंडाळा घाटात मंकी हिलजवळ रेल्वे रुळांवर दरड कोसळली
सततच्या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे संपर्क देखील पूर्णपणे तुटला आहे. लोणावळा-कर्जत दरम्यानच्या दक्षिण-पूर्व घाट विभागातील खंडाळा आणि मंकी हिल स्थानकांदरम्यान (121 ते 123 किलोमीटरच्या परिसरात) डोंगराचा मोठा भाग कोसळला आहे. रेल्वे रुळांवर अजस्र कडे आणि मातीचा ढिगारा आल्यामुळे या मार्गावरील गाड्यांची ये-जा थांबली आहे. मध्य रेल्वेचे शेकडो कामगार अत्याधुनिक यंत्रांसह ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत, मात्र घाटातील मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे दुरुस्तीच्या कामात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.