Manohar Bhosale: भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर मामा भोसले याला माढा न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना (विशाल वाघमारे व नरेंद्र सांगळे) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, एकीकडे हा दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे त्याच्यावर संघटित गुन्हेगारीचे (MCOCA धर्तीवर) कलम लावण्यात आल्याने आता जामिनासाठी त्याला बार्शी सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागणार आहेत.
करमाळा पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता
जरी माढा न्यायालयाने कोठडी दिली असली, तरी मनोहर मामाच्या अडचणी संपलेल्या नाहीत. करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. न्यायालयाच्या परवानगीने लवकरच करमाळा पोलीस त्याचा ताबा घेऊ शकतात.
बोंबील विक्रेता ते 27 एकरांचा आलिशान आश्रम
मनोहर भोसले याचा 'बोंबील विक्रेता' ते 'आलिशान मठाचा मालक' हा प्रवास अत्यंत वादग्रस्त राहिला आहे. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील रहिवासी असलेला मनोहर डी.एड. नापास झाल्यानंतर बाजारात सुके बोंबील विकायचा. अचानक बेपत्ता झाल्यानंतर परतलेल्या मनोहरने आपल्याला 'संत बाळूमामा' प्रसन्न असल्याचा दावा केला आणि भक्तांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. करमाळा तालुक्यातील घोटी येथे त्याचा 27 एकरचा टोलेजंग आश्रम आहे. येथे बाबांना भेटण्यासाठी भाविकांना चक्क 11 हजार रुपयांची फी मोजावी लागत असे.
गुन्ह्यांची मोठी मालिका
भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या मनोहर मामावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. कर्करोग आणि मणक्याचे आजार बरे करतो असे सांगून बारामती व दौंडमध्ये आर्थिक लूट केल्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. सोलापुरात एका महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक गुन्हाही त्याच्यावर नोंदवलेला आहे. अनेक बड्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरले असून, अनेक राजकीय नेते त्याच्या सल्ल्याने चालत असल्याची चर्चा होती. श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडणाऱ्या या भोंदू बाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जनसामान्यातून जोर धरत आहे.