Phaltan Electricity Accident: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खामगाव परिसरातील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ पहाटे 5:30 ते 6:00 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. घराबाहेर पडलेल्या एका सदस्याला जमिनीवर पडलेल्या विद्युत केबलमधील उघड्या तारेचा तीव्र धक्का लागला. त्यांना वाचवण्यासाठी घरातील इतर सदस्य एकामागून एक पुढे सरसावले, मात्र विजेचा प्रवाह इतका भयानक होता की संपूर्ण कुटुंबच त्याच्या विळख्यात सापडले. या दुर्दैवी घटनेत पारधी समाजातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला असून यामुळे जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये 2 महिला व 2 पुरुषांचा समावेश
या भीषण अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. किसन पिसुरड्या शिंदे, सचिन शिंदे, गंगुबाई शिंदे आणि आरती शिंदे अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. पहाटेच्या वेळी घराबाहेर पडलेल्या किसन शिंदे यांना सर्वप्रथम विजेचा तीव्र शॉक लागला. त्यांना विद्युत प्रवाहामध्ये अडकलेले पाहून घरातील गंगुबाई, सचिन आणि आरती यांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली, परंतु विजेच्या प्रचंड प्रवाहाने सर्वांनाच जागीच खिळवून ठेवले आणि काही क्षणांतच चौघांचाही मृत्यू झाला.
हेही वाचा – Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनेक वाहनांना धडक, एक पादचारी जखमी
महावितरणच्या कारभारावर संताप; पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वीज पुरवठा बंद केला आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा केला आणि चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
या घटनेमुळे मृत शिंदे कुटुंबाच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक पातळीवर महावितरणच्या सुरक्षेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घराबाहेरील खुल्या वायरमध्ये इतका मोठा विद्युत प्रवाह कसा उतरला आणि यासाठी महावितरणचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का, या सर्व बाबींचा कसून तपास पोलीस करत आहेत.