Mohsina Kidwai Passes Away: माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवाई यांचे निधन; 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गांधी कुटुंबाच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या किदवाई यांच्या निधनाने काँग्रेस वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

Mohsina Kidwai Passes Away: माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवाई यांचे निधन; 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mohsina Kidwai Passes Away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी केंद्रीय मंत्री आणि मेरठच्या माजी खासदार मोहसिना किदवाई यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी कुटुंबाच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या किदवाई यांच्या निधनाने काँग्रेस वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. आज दुपारी 3 वाजता नोएडा येथील सेक्टर 40 मधील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी वाहिली श्रद्धांजली
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी किदवाई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटले की, “मोहसिना किदवाई जी या काँग्रेसच्या निष्ठावान नेत्या होत्या. त्यांचे आयुष्य जनसेवेचा आदर्श असून त्यांनी महिलांच्या अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे.” तसेच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, किदवाई यांनी आपली सहा दशकांहून अधिक काळ राष्ट्रसेवेसाठी समर्पित केली होती. कठीण काळात त्या पक्षासाठी मार्गदर्शक दीप म्हणून उभ्या राहिल्या. त्यांचे जाणे ही देशाची आणि पक्षाची मोठी हानी आहे.

सहा दशकांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास
मोहसिना किदवाई यांचा जन्म 1 जानेवारी 1932 रोजी बाराबंकी येथे झाला होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली. त्या मेरठमधून 1978, 1980 आणि 1984 मध्ये लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच छत्तीसगडमधून 2004 ते 2010 आणि 2010 ते 2016 अशा दोन वेळा त्या राज्यसभा सदस्य होत्या. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी आरोग्य, नगरविकास, पर्यटन आणि नागरी विमानन यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. तसेच काँग्रेस कार्यसमितीच्या (CWC) त्या दीर्घकाळ सदस्य होत्या. तसेच त्यांनी पक्षाचे सरचिटणीस पद आणि हज समितीचे अध्यक्षपदही भूषवले होते.

हेही वाचा – Anti Terrorism Squad ची मोठी कारवाई; पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जाळ्याचा पर्दाफाश; पाच संशयित ताब्यात

महिला सक्षमीकरणाचा चेहरा
एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मोहसिना किदवाई यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अत्यंत साधेपणा आणि शालीनता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणि केंद्रातही त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एका अनुभवी पर्वाचा अंत झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number