Gujarat Food Poisoning : एका लग्न समारंभात अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे जेवण केल्यानंतर 400 पेक्षा जास्त पाहुण्यांची तब्येत अचानक बिघडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे गावात आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून, 59 बाधितांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील अभलोड गावात ही घटना घडली आहे. आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या दाहोदमध्ये यापूर्वीही अन्नसुरक्षेशी संबंधित अशा तक्रारी समोर आल्या होत्या, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आरोग्य विभागाकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. लग्नातील कोणत्या विशिष्ट पदार्थामुळे ही विषबाधा झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, लग्नातील आमरसामुळे लोक आजारी पडल्याची चर्चा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून गुजरातमध्ये अन्नातून विषबाधेच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दूषित अन्नाचे मूळ शोधण्यासाठी वैद्यकीय पथके गावात तैनात करण्यात आली आहेत.
VIDEO | Gujarat: Over 400 fall ill after suspected food poisoning at wedding in Dahod's Abhlod, several hospitalised, probe underway by health officials.#Gujarat #Dahod (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/lO4CZ1wOzQ — Press Trust of India (@PTI_News) April 21, 2026
हेही वाचा – Rajnath Singh: ‘शेजारील सगळेच देश चांगले, पण…’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
याच महिन्यातील यापूर्वीचे अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकार
– मुलींच्या वसतीगृहात अन्नातून विषबाधा
या घटनेआधीही याच महिन्यात 5 एप्रिल रोजी अहमदाबादमधील मेमनगर भागात असलेल्या एका मुलींच्या वसतिगृहातही विषबाधेचा धक्कादायक प्रकार घडला. पटेल समाजाद्वारे संचलित या हॉस्टेलमधील सुमारे 57 विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर खाण्यापिण्याच्या स्वच्छतेबाबत हॉस्टेल प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
– राजपुरा गावातील धार्मिक कार्यक्रमात बाधा
9 एप्रिल रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील देत्रोज तालुक्यातील राजपुरा गावात एका धार्मिक कार्यक्रमात ‘शेव-खमणी’ हा नाश्ता खाल्ल्यानंतर जवळपास 100 लोक आजारी पडले. 38 ग्रामस्थांना गंभीर त्रासामुळे रुग्णालयात भरती करावे लागले. खबरदारी म्हणून नाश्ता केलेल्या इतर 214 नागरिकांनाही वैद्यकीय उपचार देण्यात आले.
प्रशासकीय कारवाई आणि खबरदारी
गुजरातमध्ये गेल्या काही आठवड्यांत अन्नातून विषबाधेचे प्रकार सातत्याने वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या तिन्ही घटनांमधील अन्नाचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बाधित भागांमध्ये तातडीने वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमधील अन्नसुरक्षेबाबत कडक सूचना जारी केल्या आहेत. दूषित घटकांचा शोध घेण्यासाठी सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप अन्नातील कोणत्याही हानिकारक पदार्थाबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, कडक उन्हाळा असल्याने अन्नाविषयी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.