AI Impact on Hardware: तुम्ही जर पेन ड्राइव्ह किंवा मेमरी कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला आता मोठा फटका बसणार आहे. गेल्या काही आठवड्यांत पेन ड्राइव्ह आणि मेमरी कार्ड्सच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी या किमती थेट दुप्पट झाल्या आहेत. 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) क्षेत्रातील वाढती मागणी आणि पुरवठा साखळीतील विस्कळीतपणा यामुळे हे साठवणुकीचे साधने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे.
AI मुळे मेमरी चिप्सचा जागतिक तुटवडा
बाजार संशोधन संस्था 'IDC' ने दिलेल्या इशाऱ्यानुसार, AI डेटा सेंटर्समध्ये लागणाऱ्या 'DRAM' आणि 'NAND' चिप्सच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. Microsoft, Google, Meta आणि Amazon सारख्या दिग्गज कंपन्यांनी Samsung आणि Micron सारख्या पुरवठादारांवर AI चिप्स उत्पादनासाठी दबाव आणला आहे. AI कंपन्या या चिप्ससाठी प्रीमियम किंमत मोजायला तयार असल्याने, मेमरी उत्पादक कंपन्यांनी आपला मोर्चा डेटा सेंटर्सकडे वळवला आहे. परिणामी, स्मार्टफोन, PC आणि पेन ड्राइव्हसाठी लागणाऱ्या चिप्सचा जागतिक तुटवडा निर्माण झाला आहे.
किमतींमध्ये मोठी वाढ
मेमरी चिप्सचा तुटवडा इतका गंभीर आहे की, स्मार्टफोनच्या एकूण उत्पादन खर्चात 15 ते 20 टक्के वाटा असणाऱ्या या चिप्समुळे फोनच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. केवळ ऑक्टोबर ते जानेवारी या काळात मेमरी कार्ड्सच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या, तर फेब्रुवारीमध्ये त्यात पुन्हा 25 टक्क्यांची भर पडली. DRAM च्या किमती सध्या दरमहा 25 टक्के वेगाने वाढत असून, ही परिस्थिती 2027 च्या उत्तरार्धापर्यंत अशीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – RBI Update: एटीएम कार्ड चोरीला गेलं? चिंता नको! ही गोष्ट केल्याशिवाय पैसे काढता येणार नाहीत; RBIची नवी योजना
पेन ड्राइव्हच्या किमतींचा 'दररोज' नवा उच्चांक
दिल्लीतील घाऊक बाजारातील आकडेवारीनुसार, पेन ड्राइव्हचे भाव आता दररोज अपडेट केले जात आहेत. जानेवारीमध्ये 180 ते 200 रुपयांना मिळणारा 32GB चा पेन ड्राइव्ह मार्चपर्यंत 340 ते 360 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच 395 रुपयांचा 64GB चा पेन ड्राइव्ह आता 580 रुपयांना मिळत आहे. या दरवाढीचा सर्वात मोठा फटका फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी क्षेत्राला बसत असून, लग्नसराईच्या हंगामात मेमरी कार्ड्ससाठी व्यावसायिकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे.