Ashirwad Suryavanshi Century: भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या कौतुकाचा विषय ठरलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या घरातून आता आणखी एक नवा चमकता तारा पुढे आला आहे. वैभवचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर स्थानिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. समस्तीपूर येथे खेळल्या गेलेल्या एका सराव सामन्यात, 'क्रिकेट अकादमी ताजपूर'चे प्रतिनिधित्व करताना अवघ्या 10 वर्षीय आशीर्वादने अवघ्या 87 चेंडूंचा सामना करत 103 धावांची शतकी खेळी साकारली. या उजव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या खेळीत तब्बल 20 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
आशीर्वादच्या या अप्रतिम खेळीचे कौतुक त्याचा मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंशी याने सोशल मीडियावर स्कोअरकार्ड आणि व्हिडिओ शेअर करून केले. मुलाच्या या यशाने भारावून गेलेले वडील संजीव सूर्यवंशी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत, "माझा सर्वात लहान मुलगा आशीर्वाद याने सराव सामन्यात आपले पहिलेवहिले शतक झळकावले आहे. ज्याप्रमाणे तुम्ही वैभवला प्रेम दिले, तसेच आशीर्वादवरही तुमचे आशीर्वाद कायम ठेवावेत," अशी भावनिक साद चाहत्यांना घातली. संजीव सूर्यवंशी आणि आरती सूर्यवंशी यांच्या या तीन मुलांमध्ये उज्ज्वल सर्वात मोठा, वैभव मधला तर आशीर्वाद सर्वात लहान आहे. दोन्ही मुलांना अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू बनवण्याचे वडिलांचे स्वप्न आहे.
आशीर्वादच्या शतकामुळे संघाने उभारला धावांचा डोंगर
आशीर्वादच्या या वादळी शतकाच्या आणि शिवम राज याच्या 75 चेंडूतील 52 धावांच्या खेळीच्या जोरावर 'क्रिकेट अकादमी ताजपूर'ने 29.5 षटकांत 4 बाद 234 धावांचा टप्पा गाठला. शतक पूर्ण होताच आशीर्वादने मैदानावर हेल्मेट काढून अनोख्या अंदाजात आनंद साजरा केला, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सचिन-शफालीचे विक्रम मोडीत काढणारा वैभव सध्या श्रीलंका दौऱ्यावर
दुसरीकडे, आशीर्वादचा मोठा भाऊ वैभव सूर्यवंशी सध्या भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा बनला आहे. अवघ्या 15 वर्षे 71 दिवस वय असताना इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्याची थेट भारतीय संघात निवड झाली आहे. या कामगिरीसह तो राष्ट्रीय संघात निवडला गेलेला भारताचा आजवरचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकर (16 वर्षे 194 दिवस) आणि शफाली वर्मा (15 वर्षे 220 दिवस) यांचेही विक्रम मागे टाकले आहेत.
आयपीएल 2026 चा 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर'
दरम्यान, वैभव सध्या भारतीय अ संघासह श्रीलंका दौऱ्यावर असून त्याने 2 सामन्यात 58 धावा केल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 2026 च्या आयपीएल (IPL) हंगामात वैभवने 776 धावा कुटून 'ऑरेंज कॅप' आपल्या नावावर केली होती. एवढेच नव्हे तर, त्या हंगामात फक्त 36 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम करत त्याने 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर', 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर' आणि 'सुपर स्ट्रायकर' या पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली होती. आता त्याचाच लहान भाऊ आशीर्वाद देखील त्याच आक्रमक शैलीत आपली ओळख निर्माण करत आहे.