Pune Flood Alert: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही मुख्य धरणे आता पूर्ण क्षमतेने म्हणजेच 100 टक्के भरली आहेत, तर टेमघर धरणही जवळपास 93 टक्क्यांपर्यंत फुल्ल झाले आहे. सद्यस्थितीत चारही धरणांमध्ये मिळून 28.88 टीएमसी (99.09 टक्के) इतका प्रचंड साठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या काळात 11 टक्क्यांहून अधिक पाणी जास्त आहे. पाणलोट क्षेत्रातून सातत्याने होत असलेल्या आवकेमुळे धरणांची दारे उघडून पाण्याचा प्रवाह मुठा नदीपात्रात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
टप्प्याटप्प्याने वाढवला पाण्याचा प्रवाह
शनिवारी सायंकाळपर्यंत खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग काहीसा कमी करण्यात आला होता. मात्र, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक कमालीची वाढली. परिणामी, पाटबंधारे विभागाने रात्रीपासूनच पाण्याचा प्रवाह टप्प्याटप्प्याने वाढवण्यास सुरुवात केली.
दरम्यान, शनिवारी रात्री अवघा 856 क्युसेक असणारा विसर्ग रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत थेट 20,779 क्युसेकवर नेण्यात आला. खडकवासल्यासोबतच पानशेत धरणातून जलविद्युत गृहासह 5,402 क्युसेक, तर वरसगाव धरणातून सांडवा व जलविद्युत गृहाद्वारे 11,110 क्युसेक इतका मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत खडकवासला धरणातून सुमारे 6.55 टीएमसी पाणी नदीत सोडून देण्यात आले आहे.
नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासकीय सूचना
वरच्या धरणांमधून मुठा नदीत सोडल्या जाणाऱ्या या अथांग पाण्यामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, नदीकाठचे रस्ते आणि सखल भाग पाण्याखाली जाण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिकेने मुठा नदीकाठच्या तसेच सखल भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून मुठा नदीच्या पात्रात उतरणे पूर्णपणे टाळावे. तसेच आपल्या घरातील महत्त्वाचे साहित्य, वस्तू व पाळीव प्राण्यांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी हलवावे, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.